आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बहीण व तिच्या पतीचा खून केल्याच्या घटनेमुळे करवीरनगरीच्या पुरोगामित्वाला धक्का बसला आहे. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नगरीत घडलेल्या या हत्याकांडामुळे सामान्यजन हादरून गेले आहेत. तर दुसरीकडे पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना मात्र या घटनेनंतरही शांत आहेत.
शालेय शिक्षण घेत असल्यापासून प्रेमसंबंध असलेल्या मेघा पाटील व इंद्रजित कुलकर्णी या दोघांचा प्रेमविवाह मान्य नसल्याबद्दल मेघाच्या भावांनी तिचा आणि तिच्या पतीचा बुधवारी रात्री अत्यंत निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सहा महिन्यापूर्वी याच जिल्ह्य़ात बहिणीने ‘जिन्स पॅन्ट’ घातली म्हणूनही तिची हत्या केली गेली होती. या अशा घटनांनी सामान्यजन हादरून गेले असताना एरवी पुरोगामित्वाच्या नावाखाली उठसूट गळा काढणाऱ्या पक्ष, संघटना या अशा घटनांबाबत मात्र शांत आहेत. दुहेरी खून प्रकरणास दोन दिवस झाले तरी या घटनेचा साधा निषेधही झालेला नाही. एरवी पुरोगामित्वाला आव्हान देणारी छोटीशी घटना घडली तरी ढिगभर पत्रके, मोच्रे, आंदोलने, रस्त्यावर उतरुन मोडतोड अशी टोकाची प्रतिक्रिया उमटत असते. त्या पाश्र्वभूमीवर ही शांतता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनाही धक्का देणारी वाटते.
सामाजिक कार्यकर्त्यां साधना झाडबुके म्हणाल्या, जातीअंताच्या लढय़ाला प्रेरणा देणाऱ्या राजर्षी शाहूंच्या नगरीत घडलेला हा प्रकार लज्जास्पद आहे. प्रेमविवाह झालेला मुलगा ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून पुरोगामी कार्यकत्रे रस्त्यावर उतरले नसावे की काय, ही पण एक भीती वाटते आहे.
आंतरजातीय, धर्मीय विवाहाची चळवळ सुरु करणारे सामाजिक कार्यकत्रे डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले,की प्रगतीकडे समाज जाताना दिसत असला तरी मी मी म्हणणारे अजूनही जातीशी कसे चिकटून आहेत, हेच या घटनेतून दिसते.
सामाजिक कार्यकर्त्यां स्मिता पानसरे यांनी समाजामध्ये जातीअंताची भाषा केली जात असली तरी घराणे, जात याच्या प्रतिष्ठेत अजूनही एक वर्ग अडकला असल्याकडे लक्ष वेधले. सोळाव्या शतकाप्रमाणे अजूनही महिलांनी वागले पाहिजे, अशी परंपरा राखू पाहणाऱ्या प्रवृत्तींकडून या घटना घडत असून ती समाजाच्या चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी समाजाला धक्का घडवणारी घटना घडूनही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त न होण्यास पुरोगामी कार्यकत्रे जबाबदार असल्याची कबुली दिली.
ज्या गावास शाहुमहाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे, त्या गावात हा प्रकार मन विषण्ण करणारा आहे. ही घटना आंतर जातीय व आंतर धर्मीय स्वरूपाचा गुन्हा असून याबाबत गुन्हेगारांना शिक्षा करणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.