राजू शेट्टी यांची विचारणा

कोल्हापूर : करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जनतेवर निर्बंध लादण्यात आले असताना दुसरीकडे ‘गोकुळ’च्या प्रचार सभांसाठी गर्दी कशी जमवली जात आहे अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली.

गोकुळचा प्रचार शुभारंभ काल शिरोळ तालुक्यात झाला. या मेळाव्याला असलेल्या गर्दीचा उल्लेख करून शेट्टी यांनी याविषयी भाष्य केले. महाविकास आघाडीचा घटक असलेले शेट्टी यांनी शासनाला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, की करोनाची साथ वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी अंतर्गत नियमावली लागू केली आहे. कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीपुरते नियम बाजूला सारले आहेत का, असे शिरोळमधील मेळाव्याची तुडुंब गर्दी पाहून वाटत आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अशी गर्दी गोळा करणे याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न त्यांनी सतेज पाटील यांना विचारला.

जर राज्यकर्तेच  नियम पाळणार नसतील तर ते जनतेला कोणत्या तोंडाने अनुपालन करण्यासाठी सांगणार. गोकुळच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात करोना नियम निर्बंध शिथिल केले आहेत काय, अशी विचारणाही शेट्टी यांनी केली.

दारूण स्थिती

गोकुळच्या दोन ठरावधारकांचा मृत्यू करोनामुळे झाला असून एक जण अत्यवस्थ आहे, जिल्ह्यात वैद्यकीय सुविधांची वानवा जाणवत असल्याबद्दलही त्यांनी टीका केली. जयसिंगपूर येथील एका मोठ्या रुग्णालयात प्राणवायूची कमतरता असल्याने चाळीस रुग्णांचा जीव धोक्यात होता. आपण आवाज उठवल्यानंतर प्राणवायू मिळाला सांगत त्यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले.