News Flash

कोल्हापुरात विधान परिषदेसाठी शंभर टक्के मतदान

समोरासमोर झालेली जोरदार घोषणाबाजी, नेत्यांचा जयघोष, जल्लोषी वातावरण अशा स्थितीमुळे विधान परिषद निवडणुकीतील टोकाला गेलेल्या ईष्रेचा प्रत्यय रविवारी दिसून आला.

समोरासमोर झालेली जोरदार घोषणाबाजी, नेत्यांचा जयघोष, जल्लोषी वातावरण अशा स्थितीमुळे विधान परिषद निवडणुकीतील टोकाला गेलेल्या ईष्रेचा प्रत्यय रविवारी दिसून आला. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व केंद्रांमध्ये पूर्णत ३८२ इतके म्हणजे शंभर टक्के मतदान झाले. मतदानानंतर काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व बंडखोर आमदार महादेवराव महाडिक या दोघांनीही आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी बुधवारी मतपेटी उघडल्यानंतर मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात थेट लढत झाली. सलग तीनवेळा या मतदार संघात महाडिकांनी बाजी मारल्याने ते निवडणुकीच्या तंत्राआधारे यंदाही आघाडी घेतील, असे म्हटले जात होते. मात्र, पहिल्यांदाच ही निवडणूक लढवणाऱ्या सतेज पाटलांनी तोडीस तोड यंत्रणा उभी करीत महाडिकांना कडवे आव्हान दिले. यातून टोकाची ईर्षां निर्माण होऊन मताला लाखमोलाचा भाव आला होता. उभय बाजूकडून मतदारांना सहलीवर पाठविले तरी तेथेही अखेरच्या क्षणापर्यंत मतांच्या फोडाफोडीचे प्रयत्न सुरू राहिले.
या पाश्र्वभूमीवर रविवारी होणाऱ्या मतदानाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. येथील जिल्हा उद्योग भवनातील मतदान केंद्रात आमदार महाडिक हे साडेसात वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. तथापि त्यांचे सहलीवर गेलेले मतदार साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केंद्राजवळ आले. त्यांनी रांगेत उभा राहून मतदान केले. त्यानंतर सुमारे तीन तास मतदान केंद्रावर शांतताच होती. दोन वाजण्याच्या सुमारास सतेज पाटील हे स्वत भगवे फेटे बांधलेल्या मतदारांना घेऊन मतदान केंद्रात आले. मतदारांनी पाटील यांचा जयघोष सुरू केला.
परस्परांना भेटण्याचे टाळले
काँग्रेसचे मतदार मतदान केंद्रात येत असताना महादेवराव महाडिक हे त्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारात थांबले होते. तथापि, मतदारांनी त्यांच्या नमस्काराला प्रतिसाद देण्याचे टाळले. तर सतेज पाटील यांनीही त्यांच्याशी नजरानजर केली नाही. महाडिक-पाटील यांनी परस्परांना टाळण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रकार कोणाच्याही नजरेतून सुटला नाही.
हातकणंगलेत घोषणाबाजी
कोल्हापूरप्रमाणेच हातकणंगले तालुक्यात ९३  मतदान होते. येथे महाडिक यांचे पुतणे खा.धनंजय महाडिक हे मतदारांना घेऊन केंद्रावर आले तेव्हा तेथे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोरच घोषणाबाजी सुरू झाली. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, धर्यशील माने यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचे स्वागत केले. सतेज पाटील तेथेही स्वत मतदारांना घेऊन आले होते. मतदानामध्ये कोणताही धोका न स्वीकारण्याची त्यांची भूमिका दिसून आली.
गुलाल घेऊन येणार – महाडिक
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ३० तारखेच्या मतमोजणीवेळी गुलाल घेऊन येणार असल्याची प्रतिक्रिया महाडिक यांनी नोंदवली. गतवेळी विरोधात असलेलीच मंडळी यंदाही विरोधात असल्याने अभ्यासू मतदार आपल्या बाजूने कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षातून निलंबित केल्याची नोटीस अद्याप पोचली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विजय काँग्रेसचाच – पाटील
या निवडणुकीत सोबत असलेल्या २५० हून अधिक मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय काँग्रेसचाच असल्याचे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले. बंडखोरांना थारा नसल्याचे मतदार दाखवून देतील. महाडिक यांना काँग्रेस पक्षातून निलंबित केले असून नोटीस न मिळणे हा तांत्रिक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 2:10 am

Web Title: hundred percent voting in kolhapur legislative council election
Next Stories
1 भाजप-आप कार्यकर्त्यांमध्ये कोल्हापुरात वाद
2 कोल्हापूर परिसरातील दारूअड्डे उद्ध्वस्त
3 नाताळ सण कोल्हापुरात उत्साहात
Just Now!
X