सध्याच्या करोनाच्या संसर्गाच्या काळात आपण हात विषाणूमुक्त करण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरला आहे. मात्र, हा विषाणू आपल्या कपड्यांवरही असू शकतो त्यामुळे कपडे निर्जंतुक करण्यासाठी त्यांना थेट धुण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक वेळी कपडे धुवायला काढणे हे मोठे डोकेदुखीचे काम आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ‘फॅब्रिक स्प्रे’ (कपड्यांवर मारावयाचा फवारा) विकसित केला आहे. हे एक ‘विषाणू कवच असून त्यात ९९ टक्क्यांहून अधिक करोना विषाणू निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विद्यापीठात आज सकाळी नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. किरणकुमार शर्मा या संशोधकांसह या उत्पादनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पुणे येथील इकोसायन्स इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत म्हेतर, संचालक अजय म्हेतर यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना भेटून या संशोधनबद्दल माहिती दिली. शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ नॅनोफॅब्रिक्सचे प्रा. किरणकुमार शर्मा यांनी प्रा. पी. एस. पाटील आणि डॉ. किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भातील संशोधन केले आहे.

काय आहे संशोधन?

‘व्हायरस कवच फॅब्रिक स्प्रे तंत्रज्ञान’ हे वापरावयास अत्यंत सुलभ व सोपे आहे. हा स्प्रे फक्त आपल्या कपड्यांवर फवारायचा आहे. यानंतर यातील निर्जंतुकीकरणाचं औषध कपड्यांवर वाळल्यानंतर पुढे ते कपडे धुवून टाकेपर्यंत आपल्याभोवती संरक्षक कवचाप्रमाणे काम करते. कपडे धुतल्यानंतर पुन्हा त्यावर हे फवारले की काम फत्ते झाले.

यामध्ये केवळ ‘सेंद्रिय कार्बोक्झिलिक अॅसिड’ची संयुगे आहेत. ती विषारी नाहीत, तर पर्यावरणपूरक आहेत, असा दाखला अमेरिकेतील पर्यावरण सुरक्षा एजन्सीने दिला आहे. त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यताही दिलेली आहे.