जलजागृती सप्ताहात देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञेत भ्रष्टाचारासंबंधी दोन ओळी वाढवायला हव्यात,त्या म्हणजे-ज्यांनी सिंचन भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून पसे वसूल केले जातील. एवढे धुतल्या तांदळासारखे असतील तर पोलिस संरक्षण काढून रस्त्यावर फिरुन दाखवा, असे आव्हान खा.उदयनराजे भोसले यांनी दिले. जल जागृती सप्ताहाच्या निमित्ताने दुष्काळी स्थितीच्या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली.
खा.भोसले पुढे म्हणाले,की माझा लढा भ्रष्टाचारा विरोधात असून कुठला पक्ष  हे मी बघत नाही. मी भ्रष्टाचाराच्या लढय़ात कोणाला भीक घालत नाही.माझी भूमिका पक्षविरहित आहे.भ्रष्टाचारी तुरुंगात गेले पाहिजेत नाहीतर उठाव होईल.जी मंडळी भ्रष्टाचारी आहेत त्यांना घेराव घातला पाहिजे.त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे व घरपोच केले पाहिजे असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले,भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांची ज्यांनी हलाखीची अवस्था केली आहे त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे व अशा भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींकडून पसे वसूल केले पाहिजेत.धरणांची कामे वेळत न झाल्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. भ्रष्टाचार झाला नसता तर धरणे पूर्ण झाली असती आणि दुष्काळी भागाला पाणी मिळाले असते व शेतकरी,जनतेवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते. नेत्यांच्या सुरक्षेसाठी कोटय़वधीचा खर्च होतो,तो काढून दुष्काळी भागातील जनतेच्या हितासाठी द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले, भारत माता की जय म्हणणे योग्यच आहे. भारत हा आपला देश आहे.तेंव्हा त्याचा जयजयकार करायला लाज का वाटावी, असा सवाल खा.भोसले यांनी उपस्थित केला.आज देशप्रेमामुळे देश अखंड असून जर राष्ट्रप्रेम ढासळले तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण करताना लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असे राजकारण करू नये, असा सल्ला दिला.लोकप्रतिनिधींवर जनतेचा अंकुश असला पाहिजे तरच विकास होईल अन्यथा लोकशाही संपुष्टात येईल. भुजबळांचा नंबर आता कसा लागला, यावर त्यांनी, मी मटका खेळत नाही त्यामुळे भुजबळांचा नंबर अगोदर कसा  लागला हे मला माहीत नाही असे उत्तर दिले.