सीमाभागातील तरुण निवासस्थानावर मोर्चा काढणार

‘जन्मावे तर कर्नाटकात’ अशा आशयाचे कानडी गीत सादर करणारे राज्याचे महसूलमंत्री आणि सीमाभागाचे समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील संतापाची लाट दुसऱ्याही दिवशी सीमाभागात कायम राहिली. दरम्यान पाटील यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ त्यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी बेळगावसह सीमाभागातील तरुण मोर्चा काढणार आहेत.

बेळगाव जिल्हय़ातील गोकाक येथे जन्मावे तर कर्नाटकात जन्मावे गाणे गाऊन कन्नड भाषकांना खूश करण्याचा प्रयत्न सीमाभागाचे समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील केला होता. त्यावर सीमाभागातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हे सत्र सोमवारीही कायम राहिले.

कन्नड अस्मितेच्या गीतातून जन्म घ्यावा तर कर्नाटकातच असा संदेश चंद्रकांत पाटील देत असतील तर त्यांनी खुशाल कर्नाटकात जन्म घ्यावा. आमचे पूर्वज महाराष्ट्रातच जन्मले आहेत.  भलेही भाषावार प्रांतरचनेत आम्हाला घुसडले असले तरी आम्ही आजही स्वत:ला महाराष्ट्राचेच समजतो, अशी कडवट प्रतिक्रिया मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी नोंदवली आहे.

महाराष्ट्र शासनाने समन्वयमंत्री पाटील यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी किती वेळा  चर्चा केल्या, किती वेळा बेळगावला भेटी देऊन अडचणी समजून घेतल्या, त्यांनी मुख्यमंत्री,  पंतप्रधान, ज्येष्ठ विधिज्ञ आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी या प्रश्नी कधी चर्चा केली काय, असा रोकडा प्रश्नदेखील विचारला आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मंत्रिपदावर विराजमान असणारे चंद्रकांत पाटील यांनी कानडी जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण ते हे साफ विसरले की गेली साठहून अधिक वर्षे सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे, अशी वक्तव्ये करून सीमावासीय मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयन्त केला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सीमाभागातील समितिनिष्ठ मराठी तरुणांनी कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थावर मंगळवारी मोर्चा काढून धरणे धरण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती पीयूष हावळ, मदन बामणे, सूरज कणबरकर, सुनील बाळेकुंद्री यांनी दिली.

दुर्गास्तुतीचे गायन- चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मुद्दय़ावर सांगितले, की आपला सुरक्षारक्षक यल्लप्पा याच्या आमंत्रणावरून त्याच्या तवंग या गावी दुर्गादेवी मंदिराच्या वास्तुशांतीस गेलो होतो. तिथे आपण दुर्गास्तुती म्हटली. तेथे आपण ग्रामविकास व इतर मुद्यांवर बरंच काही बोललो, पण ते सारे मुद्दे न घेता त्या कन्नड गाण्यावर इतका घोळ घालण्यात आला.