दर ५२० रुपये किलो, आठवडय़ानंतर दुकाने सुरू

कोल्हापूर : नववर्षांचे स्वागत करताना झणझणीत मटणाला मुकलेल्या कोल्हापूरकरांना आता मटणावर यथेच्छ ताव मारता येणार आहे. मटणाचा दर प्रति किलो ५२० रुपये असावा, यावर विक्रेते आणि कृती समिती यांच्यात एकमत झाले. त्यामुळे गेले महिनाभर राज्यभर गाजलेला मटण दरवाढीचा प्रश्न मिटला असून मंगळवार पासून शहरातील मटण विक्री पुन्हा सुरू झाली आहे.

शहरातील मटण दरावरून कृती समिती आणि विक्रेते यांच्यातील सामना गेला महिनाभर रंगला होता. कृती समिती आणि विक्रेत्यांच्या बैठकीत ४८० रुपये दर ठरला होता. पण तो दर परवडत नसल्याने दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात आली. गेले १५ दिवस दुकाने बंद राहिल्याने संयुक्त बैठक होऊ न कृती समितीने ४८० रुपयांवरून किलोला ५०० रुपये दर देण्याची तयारी दर्शविली. मटण विक्रेते ५६० रुपये दरासाठी आग्रही राहिले.  एकमत न झाल्याने पुन्हा वाटाघाटी झाल्या. विक्रेत्यांनी ५२० रुपये प्रति किलो दराचा प्रस्ताव ठेवला. कृती समितीने तो मान्य केला. नियमाप्रमाणे तपासणी केलेले तसेच स्वच्छतेचे नियम पाळलेले उत्तम प्रतीचे मटण शहरवासीयांना मिळणार आहे.