देशात टाळेबंदी सुरू असल्याने चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण बंद झाले आहे. ही कोंडी फुटून नव्याने चित्रीकरणाला सुरुवात व्हावी असे प्रयत्न कोल्हापुरात सुरू झाले आहेत. कलानगरी कोल्हापूरमध्ये चित्रनगरीसह सर्व प्रकारची उपलब्धता असल्याने येथे चित्रीकरणाला सुरुवात होण्यासाठी मुंबईतील चित्रपट, वाहिन्या याचे निर्मात-दिग्दर्शक, वाहिनीप्रमुख यांच्याशी बोलणी सुरू आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच करोनाच्या भीतीतून विरोध करणारे सूरही व्यक्त होत आहेत.

सध्या टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मायानगरी मुंबईतील सर्व स्टुडिओंमधील चित्रीकरण बंद झाले आहे. यामुळे नवे चित्रपट तसेच वाहिन्यांवर मनोरंजनाचे नवे कार्यक्रम सादर होत नाहीत. जुन्याच चित्रपट, कार्यक्रमांचा मारा केला जात आहे. तेच ते कार्यक्रम पाहून प्रेक्षकही कंटाळले असून त्यांना नव्याची आस लागली आहे.

अशा स्थितीत सुसज्ज चित्रनगरी असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरणाला सुरुवात व्हावी यासाठी गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीतील निर्माते-दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट महामंडळातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा मराठी, हिंदी चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्याचे आवाहन के ले. चित्रनगरीला भेट देऊन त्यांनी तेथे चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधांची पाहणी केली आहे. ‘कोल्हापुरातील चित्रसृष्टीतील कलाकारांना चित्रजगतात चमकण्याची, तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येथे पुन्हा एकदा मराठी व हिंदी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यासंदर्भात दीर्घकालीन व ठोस योजना करणार आहोत. यातून कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी ही भविष्यामध्ये मदत होऊ शकते’ असे सतेज पाटील यांचे म्हणणे आहे.

कोल्हापुरात चित्रपट, मालिका यांचे चित्रीकरण व्हायचे असले तरी याचा सर्वस्वी निर्णय हा मुंबईत असणारे निर्माते-दिग्दर्शक, वाहिन्यांचे प्रमुख यांच्या हाती आहे. ‘मुंबईतील निर्माता-दिग्दर्शक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना ही कल्पना आवडली आहे. जुन्या मालिकांचे चित्रीकरण कोल्हापुरात करायचे असेल तर सेटची नव्याने मांडणी करावी लागणार असून त्याचा खर्च कसा करायचा, याचा निर्माता आणि वाहिनीप्रमुख गंभीरपणे विचार करीत आहेत. मात्र, नव्या मालिका, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचे चित्रीकरण कोल्हापुरात सुरू होऊ शकते,’ असे चित्रपट महामंडळाचे संचालक आणि कोल्हापुरात चित्रीकरण सुरू असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे प्रोडक्शन हेड रवी गावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

विरोधाचे सूर

नवे काही सुरू होणार म्हटले की कोल्हापुरात विरोधाचे दंड थोपटले जातात. चित्रीकरणाबाबतीत वादाचे पडघम वाजू लागले आहेत. ‘कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास उज्ज्वल आहे; पण सध्या करोनाची साथ सुरू आहे. कोल्हापूर या दृष्टीने सध्या तरी सुरक्षित आहे. मात्र, मुंबईसारख्या रेड झोनमधून चित्रीकरणाचा चित्रीकरणासाठी चमू आला की त्यांच्या माध्यमातून करोना फैलाव होऊन कोल्हापूरला धोका निर्माण होऊ शकतो,’ अशी भीती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. ‘चित्रीकरणाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना कलेची संधी मिळू शकते. कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. करोनाची बाधा होऊ नये याची दक्षता घेऊन चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे जाधव यांच्या म्हणण्याला अर्थ नाही,’ असे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने यांनी म्हटले आहे.