News Flash

पंचगंगा प्रदूषण प्रकरण : नदी संरक्षणासाठी ठोस पाऊल

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब  निदर्शनास आणून दिली होती.

कोल्हापूर आयुक्तांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश; दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरवून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अलका स्वामी आणि मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी दिले. नदीमध्ये रासायनिक दूषित पाणी सोडणारे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योग तसेच इचलकरंजीतील प्रोसेसर्स (कापड प्रक्रिया गृह) बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले .

पंचगंगा नदी प्रदूषणाची जोरदार चर्चा, सातत्याने होणारी आंदोलने याची दखल घऊन पर्यावरण मंत्री  कदम यांनी सोमवारी शिरोळ येथे पंचगंगा-कृष्णा  नदी, इचलकरंजीतील काळा ओढा ,कोल्हापुरातील जयंती नाला, बापट कॅम्प आदी ठिकाणी भेटी देऊ न नदी प्रदूषणाची पाहणी केली. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्यांना नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब  निदर्शनास आणून दिली होती. यानंतर कदम यांनी लोकप्रतिनिधी,  शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेतली.

या वेळी कदम यांनी  कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी  पाटील यांना नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत विचारणा केली . त्यावर या दोघांनी कामांची जंत्री वाचून दाखवली, पण ही माहिती अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आल्याने मंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच पंचगंगा प्रदूषणास कारणीभूत ठरवून त्यांनी डॉ. चौधरी, स्वामी आणि पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

झाले काय?

पर्यावरणमंत्र्यांनी सोमवारी नदी प्रदूषणाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. आयुक्त अभिजित चौधरी आणि  मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी सतत चुकीची माहिती दिल्याने संतप्त झालेले पर्यावरण मंत्री कदम यांनी खोटी माहिती देऊन लोकांची आणि शासनाची  फसवणूक का करता, खोटे बोलण्याची हिम्मत होतेच कशी, अशी विचारणा करून नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून तुरुंगात जावे लागेल, असा इशारा दिला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पर्यावरणासाठी २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद असताना त्याकडे लक्ष न दिल्याने त्यांनी आयुक्तांची खरडपट्टी काढली.

होणार काय?

प्रत्यक्ष नदीच्या दुरवस्थेची पाहणी केल्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी जाहीर केले. येथील प्रदूषण दूर करण्यासाठी इंग्लंडच्या एका पथकाची मदत घेतली जाणार असून याबाबतचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2018 2:56 am

Web Title: kolhapur municipal corporation commissioner concrete step for panchganga river protection
Next Stories
1 कोल्हापूर महापालिका आयुक्त, इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: रामदास कदम
2 पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राचा खून
3 भाजप-शिवसेना युती झाल्यास विरोधकांचा पाडाव – चंद्रकांत पाटील
Just Now!
X