११९७ कोटी रुपयांच्या तरतुदीचा अर्थसंकल्प सादर

कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना शनिवारी स्थायी समिती सभापती पुरते गोंधळून गेल्याने या सभेची रया गेली. २०१७ -१८ सालचा सुधारित आणि सन २०१८-१९ या वर्षांचा एकूण ११९७ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी आज महापालिकेच्या विशेष सभेत महापौर स्वाती येवलुजे यांच्याकडे सादर केला.

अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा असल्याचा दावा  सभापतींनी केला. मात्र हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी परिपूर्ण नसून या अर्थसंकल्पात अनेक त्रुटी आहेत, असा आरोप सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी केला.  सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प केला असता तर यातील त्रुटी दूर झाल्या असत्या, अशी टिपणीही त्यांनी केली. स्थायी समिती सभापती निवडीच्या राजकारणाचे परिणाम आजच्या सभेवर जाणवले. असा आरोप करत विविध सूचना मांडल्या. सादर करताना कोल्हापूर महापालिकेचे  आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी यापूर्वी ११५९  कोटीं  रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला होता. यानंतर स्थायी समिती सभापतींनी यामध्ये ३७  कोटी रुपयांची वाढ करून ११९७  कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर केला. मात्र, वाढ करण्यात आलेली रक्कम कशाप्रकारे जॅम करणार याचे स्पष्टीकरण द्यायचे त्यांनी टाळले.

महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी स्थायी समिती सभापती पद भाजपच्या वाटय़ाला गेले आहे. त्याचे पडसाद सभेत उमटले . या अर्थसंकल्पावर महासभेत चर्चा करताना सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. या अर्थसंकल्पावरील चच्रेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टीकेची झोड उडवली.  महेश सावंत यांनी स्थायी समिती सभापतींनी सुधारित अर्थसंकल्पाची प्रत  किमान १५  दिवस अगोदर द्यायला पाहिजे होती.  त्यामुळे योग्य तरतुदींची माहिती मिळाली नाही असा, आरोप केला. तर शारंगधर देशमुख यांनी हा अर्थसंकल्प नगरसेवकांना विश्वासात घेऊन केला नाही. प्रत्येक सदस्याला समान निधी द्यावा अशी मागणी केली. तसेच या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या मुखपत्रावर छापण्यात आलेल्या छाया चित्रावर  आक्षेप घेतला. यावेळी  भूपाल शेटे यांनी या  कुष्ठरुग्णांसाठी तरतूद केली नसल्याने  या अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवला.  जयश्री चव्हाण यांनी या अर्थसंकल्पात सामान्यांसाठी कोणत्याही तरतूद केल्या नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात महापालिकेच्या रक्तपेढीसाठी तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.

तौफिक मुल्लानी यांनी या अर्थसंकल्पाची प्रत  उशिराने दिल्याने  निषेध नोंदवला.  भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काहीच केल्याचे दिसत नसल्याचे सांगत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजपचा सभापती असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मोठा निधी महापालिकेला मिळेल अशी अपेक्षा  होती. मात्र हा अर्थसंकल्प  आयुक्तांनी सादर केलेला असून त्याची री सभापतींनी ओढली असल्याची टीकाही करण्यात आली. अर्थसंकल्पात प्रामुख्याने महापालिकेची प्रशासकीय उमारत,बहुउद्देशीय क्रीडा सभाग्रह, केशवराव भोसले नाटय़गृह तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील रस्त्यांसाठी अवघ्या साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूणच मागील योजना पुढे नेण्याचा संकल्प करणारा  हा अर्थसंकल्प असल्याचे सभेत दिसून आले.