अजित पवारांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वात जास्त करोना संसर्गाचे प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यत व्यवसाय, व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली द्यावी, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. याबाबत पवार म्हणाले, करोनाचा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी सद्याच्या स्थितीत निर्बंध अजिबात मागे घेतले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील तर अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावे यासाठी थोडा वेळ सोसावे लागणार आहे. पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना र्निबधांची कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगितली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पवार म्हणाले, बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करा. करोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून ग्रामविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदभरती तत्काळ भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यतील साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि कोविड केंद्र सुरू करावेत.

काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून जादा बिल आकारात असल्याचे आढळून आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर, जिल्ह्यतील रुग्णालयांच्या बिलाचे लेखापरीक्षण करून अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे, असा उल्लेख करून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर भर द्यावा,अशी सूचना केली. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील—यड्रावकर उपस्थित होते.