कोल्हापूर : जिल्ह्यतील करोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यतील सर्व औद्योगिक वसाहती, तेथील उद्योग शनिवारपासून आठ दिवस बंद राहणार आहेत. उद्योजक संघटनांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय येथे गुरुवारी घेण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यमध्ये करोना संसर्ग वाढत चालला आहे. रुग्ण आणि मृत्युदर यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यत कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यतील उद्योजकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज आमदार चंद्रकांत जाधव यांचे निवासस्थानी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

जिल्ह्यतील करोना प्रादुर्भाव पाहता उद्योजकांनी उद्योग आठ दिवस बंद ठेवावेत, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. त्याला उद्योजकांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यत स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कारखाने बंद ठेवले आहेत. इतरत्रही कमी-अधिक प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी काही काळ उद्योग बंद ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र जीवित हानी टाळण्यासाठी कारखाने बंद ठेवण्या शिवाय पर्याय नाही, असा मुद्दा बैठकीत पुढे आला. त्यानुसार १५ मे पासून २३ मे पर्यंत सर्व कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेटे, इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, हर्षद दलाल, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, मॅक्सचे अध्यक्ष गोरख माळी उपस्थित होते.