टाकाऊ पिंजार, उसाचा पाला यासह शेतामधील कुठलाच घटक वाया जाऊ नये यासाठी देशामध्ये मोठे प्रकल्प उभारणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यतही हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नेसरी (ता.गडहिंग्लज) येथे रमेशराव रेडेकर फाउंडेशनमार्फत समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत सुरु करण्यात आलेल्या ई मोबाईल पशुचिकित्सालयाचा लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक शेतीला जोडधंद्याची गरज असल्याचे  पाटील यांनी सांगितले . ते म्हणाले, शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुधन वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पशुधन वाढले तरच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीची पोत तपासणीसह चांगल्या प्रतीचे बी—बियाणे व खते पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

रमेश रेडेकर यांनी सुचविलेल्या सुसज्ज ५० खाटांचा दवाखाना, हिरण्यकेशी नदीतील पाणी नरेवाडी बंधाऱ्यात सोडण्यासह चंदगड पूर्व भागातील जनतेच्या पाण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. प्रत्येक शेतकऱ्यासाठी पशुधन ही गुरुकिल्ली असून याकडे त्यांनी व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, असा सल्ला कृषी मूल्याचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला.  शेतपिकासाठी दुप्पट भाव देण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून शंभर टक्के उत्पादन खर्च व पन्नास टक्के भाव दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.

आमदार हळवणकर म्हणाले, चंदगड मतदारसंघातील सगळे प्रकल्प भाजपा मार्गी लावेल. दौलत कारखान्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी राजकारण आणले. या भागातील झालेली मागणी व आंदोलने योग्य होती,  मात्र नेतृत्व चुकले. या मातीशी नाते घट्ट असलेले नेतृत्व निवडा असे आवाहन त्यांनी या वेळी केले.  रेडेकर फाउंडेशनचे रमेश रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ई—मोबाइल पशुचिकित्सालय संकल्पना राबविणारे डॉ.गंगावणे व संजीव गोखले यांचा विशेष सत्कार नामदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या अनिता चौगुले यांनी प्रास्ताविक केले. आदित्य रेडेकर यांनी आभार मानले.