X

कोल्हापुरात गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

आगामी गणेशोत्सवच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी कोल्हापुरातील प्रशासनाकडून वेगवेगळी पावले पडली.

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी कोल्हापुरातील प्रशासनाकडून वेगवेगळी पावले पडली. याअंतर्गत  कोल्हापूर पोलीस दलातर्फे दिल्या जाणाऱ्या गणराया अ‍ॅवार्डचे वितरण तसेच जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य व शासकीय विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समन्वय बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाटय़गृह येथे आयोजित केली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज सांगितले.

ध्वनिक्षेपकाची भिंत सीलबंद राहणार

गणेशत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्या मध्ये कोणत्याही ध्वनिक्षेपकाची भिंत लावणारे मालक व धारक तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील अशी यंत्रणा वापरात अथवा उपभोगात आणू नये. ती स्वत:च्या कब्जात सीलबंद स्थितीत ठेवण्याबाबचे आदेश कोल्हापूर जिल्हा दंडाधिकारी यांनी आज जारी केले.

 वीजसंच मांडणीची दक्षता 

गणेशोत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीजसंच मांडणीची उभारणी शासनमान्य विद्युत ठेकेदाराकडूनच करून घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्टीकरण शासनाचे विद्य्ुत निरीक्षक वि. वि. बिरादार यांनी आज येथे केले आहे. सदर वीजसंच मांडणीची उभारणी असुरक्षित असल्यास विद्युत अपघात होऊ  शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचित केलेल्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.