कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली, तरी आज येथे पार पडलेल्या मराठी भाषकांच्या महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने मराठी भाषकांनी उपस्थिती लावली. या उपस्थितीवरूनच कर्नाटक आणि केंद्र सरकारने बोध घेत सीमावासीयांच्या भावनांची दखल घ्यावी, असे आवाहन या वेळी उपस्थित नेत्यांनी के ली.

बेळगाव येथील टिळकवाडी वाक्सीन डेपो मदानात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या हिवाळी आधिवेशनाविरोधात महामेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी सीमा लढय़ाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी कर्नाटक सरकारने लेखी परवनगी दिली नसली, तरी कानडी सरकारच्या नाकावर टिच्चून मराठी भाषकांनी मेळावा यशस्वी करून दाखवल्याचे सांगून मराठी भाषकांनी आपल्या अस्मितेसाठी चालवलेल्या लढ्याचे कौतुक केले. त्यांच्या लढ्याचा समग्र इतिहास आणि संघर्ष कथन करून त्यांनी सर्व मराठी जनतेने एकीने या लढ्याला बळ देण्याचे आवाहन केले .

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी मराठी भाषकांवरील अन्याय कर्नाटक सरकारने सुरू ठेवला, तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील, असा इशारा दिला. राज्याचे निवृत्त सहकार सचिव दिनेश ओवूळकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. आमदार संभाजी पाटील, आमदार अरिवद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, दीपक दळवी यांची भाषणे झाली.

मेळाव्यातील ठराव

  • बेळगावसह सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा.
  • बेळगावातील सक्तीचे कानडीकरण थांबवावे.
  • कर्नाटकाकडून मुद्दाम घेतल्या जाणाऱ्या अधिवेशनाची केंद्राने दखल घ्यावी.
  • ‘काळा दिन’ प्रकरणी मराठी तरुणावर दाखल खटले मागे घ्यावेत.