कोल्हापूर : ऊस हंगाम सुरु होण्याच्या आगेमागे दराचे आंदोलनही सुरु होते. शेतकरी संघटनांकडून त्याची रचना केली जाते. गेली दोन-तीन वर्षे आंदोलनाला धार आली नाही, पण यंदा मात्र आंदोलनाचे शस्त्र उपसले जाणार आहे. याचा सुगावाच नव्हे तर त्याची व्यूहरचना कशी असणार यावर खुद्द मंत्री महोदयांनी भाष्य केले आहे. किंबहुना ऊस दराचे नाटय़ कसे रंग धारण करणार या नाटय़प्रयोगाची संहिता आणि पात्र विभागणी मंत्र्यांनी सादर केली.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे कट्टर विरोधक खासदार राजू शेट्टी यांच्याकडून कशा प्रकारे चाली होणार आणि त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साखर कारखानदार यांची साथ मिळणार या प्रयोगाची रंगीत तालीमच दाखवून दिली.

कृषी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतानाच सदाभाऊ  खोत यांनी ‘ रयत क्रांती संघटना’ गतवर्षी स्थापन केली. या संघटनेने वर्षभरात केलेल्या कामगिरीवर  मतांतरे आहेत. आता या संघटनेची दुसरी परिषद येत्या २४ ऑक्टोबर रोजी  वारणा कोडोली (ता. पन्हाळा) येथे होणार आहे. आगामी हंगामासाठी उसाचा प्रतिटन दर किती असावा यावरही खोत भाष्य करणार आहेत. पण, आपण जाहीर केलेला दर मानवला जाणार का याविषयी खुद्द मंत्रीच सांगत आहेत.

याला कारण ठरणार आहे ते राजू शेट्टी यांची ऊसदराची भूमिका, त्यांनी जाहीर केल्या जाणाऱ्या दरावरून उठणारे रान, त्याला साखर कारखानदारांकडून मिळणार प्रतिसाद  यावरून खोत यांना यंदा आंदोलन होणार याचा ठाम विश्वास आहे. याला कारण तोंडावर असलेली लोकसभा निवडणूक. शेट्टी काहीही करून  आंदोलनाचा फड पेटवणार, असे सांगत खोत आंदोलनाचे नाटय़ कसे आकाराला येणार याची संहिता वाचून दाखवतात.

यावर्षीची दिवाळी आणि हंगामही शेतकऱ्यांना गोड असणार, पण त्याला आंदोलनांची जोड असणार आहे, अशी लक्षवेधी सुरुवात खोत नाटय़ाच्या सुरुवातीलाच करतात. ते पुढे सांगतात, गेली तीन वर्षे शेतकऱ्यांना ऊ स दरासाठी आंदोलन करण्याची वेळ आली नव्हती. यावर्षी मात्र लोकसभा निवडणुका असल्यामुळे आंदोलने होण्यासाठी परिस्थिती नसली तरी ‘ते’ ओढून ताणून आंदोलन करणार. ऊ स दराचा ठोस निर्णय होत नसल्याने साखर कारखानेही बंद राहणार. त्यातून मग रंगणार उसाला दर कोणता असावा या चर्चेचे गुऱ्हाळ. दोन तीन बैठकांचे उपकथानक रंगणार.  दरावरून ताणाताणी होणार. काही साखर कारखानदार एफआरपी प्रमाणे देयके देऊ  शकत नाही असे सांगत राहणार.  सरतेशेवटी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय होऊ न ही सुखांतिका टाळ्यांच्या गजरात संपणार !

ही संहिता सादर करतानाच दुसऱ्या नाटय़प्रयोगात खोत स्वत: मुख्य भूमिकेत असणार आहेत. याच काळात रयत क्रांती संघटना शासन व साखर कारखानदार यांच्यात संवाद ठेवण्याचे काम करत राहील. कारखानदार आणि शेतकरी एकमेकांचे शत्रू हे पटवून देऊ न आंदोलन करून मार्ग काढण्यापेक्षा सुरुवातीपासूनच चर्चा सुरू ठेवली तर मार्ग निघेल, असा प्रयत्न केला जाईल. या नाटय़ात ऊ स दराबाबत न कळणारी माणसे कळणाऱ्यांकडे आपली भूमिका मांडतील आणि योग्य निर्णय घेतील, अशा आशयाचे हे नाटय़ असेल. ही स्थिती पाहता मंत्री भूमिका साकारणारे नाटय़ अधिक रंगते,की खासदार मंचावर असणारे अधिक खुलते याकडे रानोमाळच्या रांगडय़ा बळीराजाचे लक्ष न जाईल तरच नवल.