राज्यशासनाच्या वीजदर सवलतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात यंत्रमाग वीजदरामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना प्रति युनिट १ रुपये १५ पैसे इतके अनुदान मिळाल्याने वीज देयकाचे ओझे काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, साध्या यंत्रमागधारकांना याचा लाभ होणार नसल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशात सर्वाधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. विकेंद्रित क्षेत्रातील भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, विटा, नागपूर अशा विविध भागांतील यंत्रमाग व्यवसायात आर्थिक अडचण निर्माण झाल्याने यंत्रमागधारकांचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. अशातच मागील शासनाने वीज बिलात वाढ केल्याने त्याचा फटका यंत्रमाग उद्योगाला बसत होता.

वीज दर वाढ कमी केली जावी आणि पूर्वीप्रमाणे प्रतियुनिट १ रुपये २२ पैसे अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू होता. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा यंत्रमागधारकांनी पाठपुरावा सुरू ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बैठक घेऊन सवलत देण्यासाठी पाठपुरावा केला. आमदार प्रकाश आवाडे यांनीही अधिवेशन सुरू असताना मंत्र्यांसोबत सलग बैठकांमध्ये हा विषय मांडला. याचे फलित म्हणजे राज्य शासनाने २७ अश्वशक्ती ते २०० अश्वशक्ती वीज वापर करणाऱ्या २ हजार कारखानदारांना १ रुपये १५ पैसे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मागील सरकारने घोषणा केलेली ४० पैसे आणि विद्यमान शासन काळातील ७५ पैसे असा समावेश आहे. २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारक मात्र या सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत.

आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारतर्फे राज्यातील २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारच्या घोषणेनुसार राज्यात २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांना वीजदरात ३ रुपये ७७ पैसे प्रति युनिट अनुदान आहे. २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना ४ रुपये १५ पैसे प्रतियुनिट अनुदान देण्यात येणार आहे. याचा अर्थ सरकार लघु उद्योजकांना कमी अनुदान देते. त्यामुळे आपण साध्या यंत्रमागधारकांना (२७ अश्वशक्तीच्या आतील) मूळ दर १ रुपये ६६ पैसे प्रति युनिट व्हावा, या मागणीकरिता रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिला आहे.

अन्य मागण्यांचा पाठपुरावा

राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यंत्रमागास १ रुपये १५ पैसे अनुदान देण्याची अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा स्वागतार्ह आहे. वीज सवलतीचा लाभ साध्या यंत्रमागधारकांना मिळावा तसेच मागील सरकारने व्याजात ५ टक्के सवलत देण्याबाबतचे प्रस्ताव नागपूर संचालक कार्यालयात प्रलंबित असून त्यातील उणिवा दूर करून अशा यंत्रमागधारकांना लाभ मिळावा असाही प्रयत्न आहे. राज्याच्या वस्रोद्योग धोरणात जाहीर केलेल्या सर्व प्रकारच्या सवलती मिळाव्यात. केंद्र शासनाचे अनुदान १० टक्क्य़ांवरून पूर्ववत ३० टक्के व्हावे असाही प्रयत्न सुरू आहे, असे माजी वस्रोद्योग मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.