मुंबई खंडपीठाचे सर्किट बेंच सुरू होण्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांनी अडचण निर्माण केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटना आणि खंडपीठ कृती समितीने पुकारलेल्या गुरुवारच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील वकील आणि लोकप्रतिनिधींनी शहराच्या मुख्य मार्गावर रॅली काढून सíकट बेंचबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. दुस-या दिवशीही कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकिलांचा न्यायालयीन कामकाजावरील बहिष्कार कायम होता.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू करण्याचा निर्णय निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा हे बुधवारी निवृत्तीच्या दिवशी घेतील अशी अपेक्षा खंडपीठ कृती समितीला वाटत होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याने वकिलांनी त्याच दिवशी शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानुसार बुधवार ते शुक्रवार तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. तर, आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी गुरुवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. सर्वपक्षीय संघटना व खंडपीठ कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील व्यापारी पेठेतील दुकाने बहुतांश बंद होती. तर आडबाजूला व उपनगरातील व्यवहार मात्र सुरू होते.
वकील, पक्षकार आणि लोकप्रतिनिधी यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आजही जोरदार निदर्शने केली. शहा यांच्याविषयी संतप्त भावनांचे दर्शन घडले. आशिया खंडातील सर्वात खोटी बोलणारी व्यक्ती अशा शब्दात शहा यांच्या निषेध फलकाखाली मजकूर लिहून त्यांच्याविषयीचा राग वकिलांनी व्यक्त केला.  आंदोलनस्थळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. वाय. पाटील, शहर अध्यक्ष राजू लाटकर, महापौर वैशाली डकरे, प्रतिमा सतेज पाटील, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे आदींनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. यानंतर वकील, लोकप्रतिनिधींची रॅली निघाली. शहराच्या मुख्य मार्गावर महारॅली निघाल्याने या मार्गावरील व्यवहार बंद झाले.
महापालिका सभा तहकूब
दरम्यान, कोल्हापूर येथे सíकट बेंच सुरु व्हावे या मागणीसाठी नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करीत महापौर वैशाली डकरे यांनी गुरुवारची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सभेचे कामकाज सुरु झाले. पण राजेश लाटकर यांनी केलेले सíकटबेंचच्या पाठिंब्याचे भाषण वगळता कामकाज तहकूब करण्यात आले. खंडपीठ कृती समितीच्या मागणीसोबत शहरातील सर्व नगरसेवक असल्याचे त्यांनी नमूद केले.