स्थानिक नेत्यांचा परस्परांवरील ‘हल्लाबोल’ संपुष्टात आणणे हेच आव्हान

पुन्हा सत्तेत येण्याचे वेध लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आघाडी उघडली आहे. पक्षाची मुळे घट्ट करण्याचाही प्रयत्न सुरू असला तरी कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्थानिक नेत्यांनी एकेमेकांवर सुरू केलेला हल्लाबोल संपुष्टात आणणे हेच खरे आव्हान आहे. शरद पवार यांच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दौऱ्यात कोणालाही कानपिचक्या दिल्या गेल्या नसल्याने गटबाजी करणारे स्थानिक नेते परस्परांवर चिखलफेक करण्यात मश्गुल आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वाद, तालुकापातळीवरील नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता- गटबाजी, भाजपात प्रवेशाची शक्यता यामुळे पक्ष संघटना बळकट होण्याऐवजी मतभेदच प्रकर्षांने समोर येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे अस्तित्व भक्कम आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यामध्ये विजय मिळवत स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न राहिला. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे. त्याला स्थायिक नेत्यांमधील लाथाळ्या कारणीभूत ठरल्या. हा प्रकार निदर्शनास येऊनही वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे कानाडोळा केला. परिणामी गटबाजी फोफावत राहिली आणि पक्षाचे स्थान कमकुवत होत चालले.

मंडलिक, मुश्रीफ, महाडिक वाद आणि फेरमांडणी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्य़ाच्या राष्ट्रवादीची नेतृत्वाची सूत्रे एकवटली. याच बँकेच्या कारभारावरून दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ या गुरु-शिष्यांमधील टोकाचा संघर्ष जिल्ह्य़ाने अनुभवला. डिसेंबर २००६ मध्ये  दोघांतील संघर्ष चिघळला. मंडलिक संसदेत तर, मुश्रीफ विधानसभेत पोहचले. खासदारविरुद्ध आमदार हा वाद आता नव्याने रंगला आहे.  विरोधी गोटात राहून ३-४ वर्षांचा काळ लोटला तरी जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीमध्ये गटबाजीचे लोण वाढतच आहेत. सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था येथील सत्ता पक्षाने गमावली आहे . आता तर हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील  वाद टोकाला जाताना दिसत आहे . महाडिक यांना चुरशीच्या लढतीत निवडून आणले पण ते पक्ष संघटन करण्याच्या कामात कसलेच योगदान देत नाहीत, उलट त्यांच्या कल  भाजपाकडे आहे, अशी टीका मुश्रीफ यांच्याकडून केली जाते . महाडिक यावर काहीच स्पष्टपणे बोलत नसल्याने त्यांच्याविषयीची गूढ आणखी गंभीर होत आहे . अलीकडे तर मुश्रीफ यांनी दिवंगत मंडलिक यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचा जणू विडाच उचलला आहे . मुश्रीफ यांच्या विधानामुळे पक्ष कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

आव्हान वाढत्या नाराजीचे

सत्ता नसल्याने राष्ट्रवादीमध्ये बैचेनी आहे. राज्यस्तरीय आणि स्थानिक नेते लक्ष देत नसल्याने नाराजी वाढत आहे. माजी खासदार निवेदिता माने, त्यांचे पुत्र धैर्यशील माने, पक्षाचे सरचिटणीस राजेंद्र पाटील यड्रावकर, मानसिंगराव गायकवाड आदी प्रमुख कामकाज पद्धतीवर नाखूष आहेत. खासदार महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर हे पक्ष बांधणीत सक्रिय नसल्याची खंत कार्यकर्त्यांना आहे. अशातच महाडिक आणि कुपेकर यांची कन्या नंदाताई बाभुळकर या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने अस्वस्थेत भर पडत आहे. आश्वासक वातावरण नसेल तर पक्षात इनकमिंग कसे होणार हा प्रश्न आहे. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना नमवण्याची गर्जना होणार असली तरी  स्थानिक विवादाला आवर घालणे आणि आगामी निवडणुकांसाठी उमेदवार शोधणे हे आव्हान अजित पवारांपासून ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापर्यंत सर्वासमोर आहे .