चंद्रकांत पाटील यांचा कोरेगावप्रकरणी इशारा

कोल्हापूर : भीमा कोरेगावप्रकरणी केंद्र शासनाच्या चौकशी समितीला अर्थात ‘एनआयए’ला राज्य सरकारने सहकार्य केले पाहिजे, अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, या प्रकरणी आमची कुणाचीही चौकशी केली तरी आम्ही त्याला घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला तुम्हाला कुणी अडवले आहे, आम्ही स्वच्छ आहोत. तसेच तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा, असे थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिले.

या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाआघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वत: मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. ते स्वत:च सगळ्या घोषणा करतात, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.