देशात केवळ हिंदुत्ववादाचा विचार चालवणे हे देशासाठी घातक आहे. सर्व धर्मीयांचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे काल कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. राधानगरी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार माजी आमदार के.पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुदाळ येथे काल सायंकाळी प्रचार सभा झाली. आज सकाळी ते पुढील प्रचारासाठी रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईमध्ये झालेल्या युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत  हिंदुत्वाच्या मुद्यावरच भर दिला गेला, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, देशात सर्वधर्मीयांचा सन्मान गरजेचा असताना केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक आहे.

एकोपा राखण्याची सूचना

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी , स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात कुरबुरी वाढल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राज्य अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी काल पवार यांची भेट घेऊ न कुरघोडय़ा थांबवाव्यात अशी मागणी केली होती. हा संदर्भ घेऊ न पवार यांनी ‘आपल्यातील सर्व नाराजी बाजूला ठेऊ न कामाला लागा’, असा आदेश जिल्ह्यतील उभय काँग्रेसच्या नेत्यांना दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठय़ा होतात याचा धक्का बसतो, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. कोल्हापुरातील विचारांशी ते सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.महाआघाडी मधील प्रत्येक उमेदवार आपला समजा. त्याचा प्रचार करा. येथे पुरोगामी विचारांशी तडजोड होत नाही हे दाखवून द्या,  असे आवाहन त्यांनी केले.

आघाडीतील प्रमुखांशी चर्चा

कोल्हापूर जिल्ह्यतील महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज सकाळी लवकर शरद पवार यांची भेट घेतली. स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी.एन. पाटील आदींनी त्यांची भेट घेऊ न चर्चा केली. निवडणुकीतील यशाबाबत पवार यांनी त्यांच्याशी कानगोष्टी केल्या.