पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरवून कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे दिले. नदीमध्ये रासायनिक दूषित पाणी सोडणारे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योग तसेच इचलकरंजीतील प्रोसेसर्स (कापड प्रक्रिया गृह) बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणाची जोरदार चर्चा, सातत्याने होणारी आंदोलने याची दखल घेऊन पर्यावरण मंत्री कदम यांनी आज (सोमवार) शिरोळ येथे पंचगंगा-कृष्णा नदी, इचलकरंजीतील काळा ओढा, कोल्हापुरातील जयंती नाला, बापट कॅम्प आदी ठिकाणी भेटी देऊन नदी प्रदूषणाची पाहणी केली. यावेळी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्यांना नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. यानंतर कदम यांनी शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेतली.

बैठकीवेळी कदम यांनी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त चौधरी आणि इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील यांना नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत विचारणा केली. त्यावर या दोघांनी कामांची जंत्री वाचून दाखवली. पण ही माहिती अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आल्याने मंत्र्यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली.

इंग्लंडच्या पथकाची मदत 

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी इंग्लंडच्या पथकाची मदत घेतली आहे, असे सांगत कदम यांनी या पथकातील अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. हे पथक कालबद्ध कार्यक्रम आखणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

तुरुंगात जावे लागेल

आयुक्त चौधरी आणि पाटील यांनी सतत चुकीची माहिती दिल्याने संतप्त झालेले पर्यावरण मंत्री कदम यांनी खोटी माहिती देऊन लोकांची आणि शासनाची फसवणूक का करता, खोटे बोलण्याची हिमंत होतेच कशी अशी विचारणा करून नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून तुरुंगात जावे लागेल, असा इशारा दिला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात पर्यावरणासाठी २५ टक्के रक्कम खर्च करण्याची तरतूद असताना त्याकडे लक्ष न दिल्याने त्यांनी आयुक्तांची खरडपट्टी काढली.