कोल्हापूर जिल्हयात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च झाल्याने त्यावर शेरेबाजी करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या एका निवडणुकीच्या खर्चातून अवघ्या राज्याची निवडणूक लढविली असती, अशी टिप्पणी करुन निवडणुकीतील अवाढव्य खर्चाबद्दल चिंता व्यक्त केली. पवारांच्या टिप्पणीमुळे निवडणूक खर्चाला आवर घालण्याची गरज प्रकर्षांने निर्माण झाली असली तरी हा प्रकार घडत असताना पवार यांनी तो रोखला का नाही, किमानपक्षी आपल्या पक्षाच्या मतदारांना तरी त्यापासून परावृत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. आग लागली असताना ती विझविण्याऐवजी नंतर त्यावर टिकाटिप्पणी करण्यातून नेमके काय साध्य होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थागटातील आठ जागांची निवडणूक अलिकडेच पार पडली. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच त्यातील अर्थपूर्ण व्यवहाराबद्दल चर्चा होऊ लागली होती. मोजके मतदार असल्याने त्यांना वश कसे करायचे याचे तंत्र अवगत असल्याने उमेदवारांकडून त्याचेच अनुकरण झाले. पाण्यासारखा पसा खर्च करुन मतदार आपल्याबाजूने झुकेल, याची चोख व्यवस्था केली. याला कोणताही मतदारसंघ अपवाद राहीला नव्हता. या निवडणूक तंत्रात कोल्हापुरातील उमेदवारांनी चार पावले पुढची चाल खेळली. एकाने दिलेल्या ऑफरपेक्षा दुसऱ्याने चढया दराची बोली लावली. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व बंडखोर, भाजपाचे पािठबा असलेले महादेवराव महाडिक या दोन्ही उमेदवारांनी मतदारांसाठी रमणा उघडला होता. उभयतांच्या दौलतजादाची चर्चा राज्यभर झाली. निवडणुकीचा निकाल लागून महाडिकांना पराभूत करुन पाटील विजयी झाले. त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेऊन कामांना सुरवातही केली.
नेमक्या याचवेळी कोल्हापूर दौऱ्यावेळी आलेल्या पवारांनी शेतकरी संघाच्या कार्यक्रमात बोलताना विधानपरिषद निवडणुकीचा संदर्भ देत पशाच्या मुबलक वापरावर शेरेबाजी केली. सतेज पाटील व महाडिक यांचे पुतणे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीच त्यांनी चिमटा काढला. कोल्हापूर जिल्हा सधन म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत आपण लोकसभा व विधानसभेच्या १४ निवडणुका लढविल्या. विधानपरिषद निवडणुकीत मात्र भलतेच ऐकायला मिळाले. यानिमित्ताने समाजात पसा गेला हे चांगलेच झाले. इतक्या पशात राज्यातील विधानसभा निवडणूक लढविली असती, अशी शेरेबाजी केल्यावर सभागृहात हशा पसरला होता.
निवडणूक खर्चावर पवारांनी केलेली मार्मिक टिप्पणी योग्यच होती. त्यांच्या विधानामुळे कदाचीत या प्रकाराला अंकुश लागण्याची अंधूक आशाही आहे. पण या निमित्ताने खुद्द पवारांबाबत काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. कोल्हापूरच्या निवडणुकीत मतदारांवर लाखोंची उधळण केली जात असताना पवारांनी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांना का रोखले नाही. त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून आला. तेथे ज्या मार्गाचा अवलंब केला तो कोल्हापूर पेक्षा वेगळा नव्हता. त्यामुळे पशाचा मुबलक वापर करीत निवडणुका जिंकण्याचे जोमाने प्रयत्न सुरु असतानाच पवारांनी ते रोखण्याची गरज होती. ती त्यांनी वेळीच केली असती तर त्यांच्या कृतिशीलतेलाही अर्थ राहीला असता. यंदा राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद यांच्या निवडणुका होणार असून त्यामध्येही पशाची उधळण होणार हे उघड असल्याने तो प्रकार थांबविण्यासाठी पवारांकडून पावले टाकली गेल्यास उक्ती-कृतीचा मेळ साधला जाऊन निवडणुकीला विधायक वळण मिळण्याची शक्यता आहे.