12 July 2020

News Flash

कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा ‘गोकुळ’

विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा त्रासदायक ठरू नये म्हणूनच इच्छुकांनी आतापासूनच खबरदारी घेतली आहे.

दयानंद लिपारे, कोल्हापूर

राज्यातील सर्वात मोठय़ा आणि २२०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाला बहुराज्य (मल्टिस्टेट) दर्जा  देण्यावरून कोल्हापूर जिल्ह्य़ाचे राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत गोकुळचा मुद्दा गाजला आणि त्याचा राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना फटका बसला. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा त्रासदायक ठरू नये म्हणूनच इच्छुकांनी आतापासूनच खबरदारी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा गाजेल, अशी चिन्हे आहेत.

गोकुळ दूध संघ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा नेहमीच गुणवत्तेपेक्षा तेथील ‘मलईदार’ कारभारामुळे चर्चेत राहिला आहे. तेथील खाबुगिरीची प्रकरणे वेशीवर टांगली जात असल्याने जमेच्या बाजू झाकोळून जातात. गोकुळच्या बहुराज्य दर्जावरून पुन्हा एकदा संघाच्या कामगिरीपेक्षा तेथील राजकीय घडामोडींना तोंड फुटले आहे. गोकुळच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ गटाकडून आमदार सतेज पाटील यांचे पॅनल थोडक्या मताने पराभूत झाले. त्यानंतरही त्यांनी संघाच्या कारभारावर प्रहार करणे सुरू ठेवले. गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत संघाला बहुराज्य दर्जा मिळवून देण्याचा विषय होता. मात्र, सभा पद्धतशीरपणे अवघ्या तीन मिनिटांत गुंडाळली गेली. सहकारी संस्थांच्या कारभाराच्या खाक्यानुसार या विषयाला मंजुरी मिळवण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. याच वेळी घडलेल्या राजकीय घडामोडी परिणामकारक ठरल्या.

लोकसभेला फटका, विधानसभेला सावध

गोकुळ संघ बहुराज्य झाल्यास गावोगावच्या दूध संघाचे, तेथील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अस्तित्व पुसले जाण्याचा धोका आहे, अशी मांडणी गोकुळ बचाव कृती समितीने सातत्याने केली आहे. परिणामी या विषयावर चर्चा न करता सभा आटोपती घेण्याची शक्कल कारभाऱ्यांनी लढवली. वार्षिक सभा तीन-चार तास चालवण्याची अरुण नरके यांनी सुरू केलेली प्रथा गेल्या तीन अध्यक्षांनी मातीमोल केली. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात बहुराज्यकारणावरून संशय निर्माण झाला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना नाराज शेतकऱ्यांचा फटका बसल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा प्रत्यय गोकुळबाबत दिसत आहे. बहुराज्यकारणाला विरोध असल्याने विधानसभा निवडणूक लढवताना शेतकऱ्यांची नाराजी भोवण्याची शक्यता असल्याने सावध भूमिका घेतली जात आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या बहुराज्यकारणाला विरोध दर्शवला आहे. गोकुळचे संचालकपद म्हणजे घरी लक्ष्मी नांदण्याची हमी. तरीही डोंगळे यांनी गोकुळविरोधात रणशिंग फुंकले आहे. याला कारण म्हणजे राधानगरी मतदारसंघात त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी गोकुळचे संचालकपद पणाला लावले आहे. परिस्थितीची जाणीव झाल्याने ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी, बहुराज्यकारणाला कडाडून विरोध करणारे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहून निवडून आणणार असल्याचे जाहीर केले. यावरून गोकुळचे नेते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी नरके यांचा राजकीय संघर्ष अटळ आहे. गोकुळचे संचालकपद असलेल्यांना याचा त्रास होण्याची चिन्हे आहेत. त्यामध्ये राजेश पाटील – चंदगड, अंबरीश घाटगे – कागल, अनुराधा पाटील -शाहूवाडी, अनिल यादव – शिरोळ, धैर्यशील देसाई – राधानगरी यांच्यासह आमदार अमल महाडिक यांचा समावेश आहे, तर बहुराज्यकारणाविरोधात ठाम भूमिका घेतल्याचा सतेज पाटील, मुश्रीफ, नरके, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींना फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे.

चंद्रकांत पाटील निर्णायक

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात भाजपचे अस्तित्व ठळक करण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महादेवराव महाडिक यांची साथ सर्वात महत्त्वाची ठरली. पाटील यांनीही महाडिक यांच्या घरात आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे दिली. लोकसभा निवडणुकीत या प्रेमाला ओहोटी लागली. शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा प्रचार करताना महाडिक यांना उद्देशून ‘आमची मैत्री पाहिली, दुश्मनी पाहू नका, राज्य शासन गोकुळ बहुराज्य होऊ  देणार नाही’ असा रोखठोक इशारा दिला होता. ‘गोकुळ हा महाडिक यांचा ‘प्राण’ आहे. गोकुळचे गणित बिघडू नये म्हणून धनंजय महाडिक यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याऐवजी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची सक्ती करण्यात आली. हा माझा बॉम्बस्फोट आहे’, असा उल्लेख मंत्री पाटील यांनी केला होता.

निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा रंगू लागली आहे. आमदार सतेज पाटील यांनी ‘गोकुळला बहुराज्य दर्जा मिळण्यासाठी आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर व धनंजय महाडिक हे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत. आता चंद्रकांतदादांनी गोकुळ बहुराज्य होऊ  देणार नाही हा शब्द पाळावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजपला विधानसभा निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण करायचे असल्याने गोकुळ बहुराज्यकारणाबाबतीत चंद्रकांतदादांची भूमिका निर्णायक ठरणार हे मात्र निश्चित.

शिवसेनेचा विरोध : कोल्हापुरात पालकमंत्री पाटील आणि महाडिक यांचे गुळपीठ जमण्याची चिन्हे असताना शिवसेनेच्या गोटातून महाडिकविरोधाचे बोल ऐकू येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी नवी दिल्लीत गोकुळच्या बहुराज्यकारणाला विरोध केला आहे. ‘गोकुळ बहुराज्यकारणासाठी आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत. सभेचा अजेंडा व इतर कागदपत्रे यामध्ये तफावत असल्याने संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय हा निर्णय करू नये’, अशा मागणीचे निवेदन मंडलिक यांनी केंद्रीय दुग्धविकासमंत्री गिरीराज सिंग यांना दिले आहे. गोकुळ बहुराज्यकारणाला विरोध करणारा मुद्दा लाभदायक ठरू शकतो याचा संदेश लोकसभा निकालाने दाखवून दिला आहे. त्यामुळे तोच कित्ता शिवसेना विधानसभा निवडणुकीत गिरवण्याच्या प्रयत्नात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 1:41 am

Web Title: politics over multi state status to gokul milk brand kolhapur zws 70
Next Stories
1 सातारा : सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील वाहतूक धोकादायक
2 कोल्हापुरात मुसळधार पाऊस; आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा
3 लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार
Just Now!
X