राज्याच्या कर्जाचा बोजा अडीच लाख कोटींवरून चार लाख कोटींवर गेला. हा पसा  विकासकामांवर खर्च झाला असेल तर अद्यापही राज्यात सर्वत्र खड्डेच आहेत. संपूर्ण राज्यच खड्डय़ात गेले असून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचा खड्डेमुक्त महाराष्ट्राचा दावा पोकळ ठरला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

राज्यातील खराब रस्त्यांवरून शासनाला टीकेला तोंड द्यावे लागल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला खड्डेमुक्त महाराष्ट्राची मोहीम १५  डिसेंबपर्यंत यशस्वी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेची मुदत संपली तरी खड्डे कायम असल्याने याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, की राज्याच्या तिजोरीतील मोठा निधी रस्त्यावर खर्च होत आहे. हा निधी नेमका किती खर्च झाला हे समजण्यासाठी राज्य शासनाने श्व्ोत पत्रिका काढली पाहिजे.

पाटील यांनी ‘खड्डे दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा’ अशी घोषणा ऑगस्ट महिन्यात केली असता, मी तेव्हाच शासनाला बक्षीस वाटण्यासाठी नोटा भरलेले ट्रक घेऊन फिरावे लागेल असे विधान केले होते. आजही रस्त्यांची अवस्था वाईट आहे.  संपूर्ण राज्यच खड्डय़ात गेले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील रस्त्यांची तर चाळण झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेबाबत मुख्यमंत्र्यांचे विधान चुकीचे

केंद्र शासनाने मागे दिलेल्या कर्जमाफीत घोटाळा झाल्याचे विधानसभेत सांगताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत चुकीचे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बदनामी झाली असल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुश्रीफ म्हणाले, की शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शासनाच्या माहिती तंत्रज्ञान व सहकार खात्याच्या कारभारामुळे अडचणीची ठरली. दिवाळीत घाईने दिलेली सन्मानपत्रे चुकीची झाल्याने ती मागे घेण्याची सरकारवर नामुष्की आली. हे सर्व अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केंद्राच्या कर्जमाफी योजनेत घोटाळे झाले असल्याचे विधान केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गतवेळच्या कर्जमाफीतील ११२ कोटीची कर्जे नाबार्डने अपात्र ठरवून कर्जमाफी रद्द केली असल्याचे आणि त्यामध्ये माझे निकटवर्तीय युवराज पाटील यांचे मोठे कर्ज असल्याचा उल्लेख केला. पण सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केल्याने ते चुकीचे बोलत राहिले.

विमान सेवा गैरसोयीची

कोल्हापुरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी चंद्रकांत पाटील, संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे अभिनंदन करून मुश्रीफ यांनी ही विमानसेवा अखंडित सुरू रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, मी व सतेज पाटील मंत्री असताना विमानसेवा दोनदा सुरू केली पण गैरसोयीची वेळ आणि त्यामुळे प्रवाशांचा घटलेला प्रतिसाद यामुळे ती फार काळ तग धरू शकली नाही. आत्ताही हे दोष कायम दिसतात. ही बाब लक्षात  घेऊन या तिघांनी विमान सेवा अखंडित सुरू ठेवण्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.