13 December 2019

News Flash

मार्ग सुरू झाल्याने व्यापारउदीम गतिमान

पुणे-बंगळूरु महामार्ग सहा दिवसांनंतर खुला

(संग्रहित छायाचित्र)

दयानंद लिपारे

महापुराच्या आपत्तीत ठप्प झालेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या चाकांना सोमवारी आठवडाभरानंतर गती मिळाली. लहान-मोठय़ा वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरील जनजीवन आणि अर्थकारणही प्रवाहित झाले. मरगळलेल्या वाहन व्यवसायाला नव्याने उभारी लाभली. कोल्हापूर, बेळगाव, कराड या मार्गावर असणारे हजारो ट्रक, कंटेनर, बस पुराच्या पाण्यातून वाट काढत मुंबई वा बेंगलोरच्या दिशेने रवाना झाली.

पंचगंगा नदीला महापूर आल्याने या नदीवर बांधलेला पूल आणि पुलाच्या सुमारे एक किलोमीटरचा रस्ता पाण्यात बुडाला. आठ फूट पाणी पुलावरून वाहत असल्याने पुणे-बेंगळूरु महामार्गावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी प्रशासनाने घेतला. तेव्हापासून या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गावर सक्तीची विश्रांती घेणे भाग पडले. या काळात कराड, कोल्हापूर, निपाणी, बेळगावपर्यंतच्या सुमारे १५० किमी अंतरात हजारो वाहने जागीच खिळली होती. या महामार्गाला प्रथमच इतकी स्तब्धता पाहावी लागली.

सोमवारी सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटांवर होती. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे आदींनी महामार्गावर रस्त्याची सकाळी पाहणी केली. त्यानंतर प्रथम अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू करण्यात आली. ही वाहतूक व्यवस्थित होत असल्याचा अंदाज आल्यावर अन्य वाहनासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सकाळी नऊ  वाजता सुरू करण्यात आली आहे.  दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. दुचाकी वाहतूक बंद आहे. टँकर, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टँकर, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्याने कोल्हापूर शहरात येत आहेत. पुण्याच्या दिशेने तसेच बेळगावपर्यंत वाहतूक सुरू असून गरज असेल तरच बाहेर पडा. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून पडली होती.

समन्वयाअभावी पूरस्थिती गंभीर – आंबेडकर

प्रशासनातील समन्वयाअभावी पूरस्थिती गंभीर झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. धरणांतील पाण्याचा विसर्ग वेळीच केला असता तर पुराचा धोका टाळता आला असता किंवा त्याची व्याप्ती वाढली नसती, असे त्यांनी निदर्शनास आणले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी दोन दिवस सांगली, कोल्हापूर येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. त्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टीनंतर धरणातून पाण्याच्या विसर्गास प्रारंभ केला. विसर्ग अधिक असल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यात दोन लाख जनावरे व ७० हजार लोक बाधित झाले. तसेच नागरिकांना प्रशासनाची मदत झाली नाही. त्यापेक्षा स्थानिकांनीच अधिक मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on August 13, 2019 2:15 am

Web Title: pune bangalore highway open after six days abn 97
Just Now!
X