बारामती येथे काल विधान परिषद उमेदवारी नक्की करून शरद पवार यांच्यासमवेत आमरस-पुरीचा गोडवा चाखल्यानंतर आजचा दिवस राजू शेट्टी यांच्यासाठी कडवट ठरला. त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान खंदे समर्थक आणि पूर्वाश्रमीचे सहकारी अशा दोन्ही बाजूने बुधवारी त्यांच्यावर बोचरी टीका झाली.

राज्यपाल कोट्यातून शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घोषीत केला. त्यानंतर पवार यांनी शेट्टी यांचा सत्कारही केला. त्यावर शेट्टी यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे कालचा दिवस शेट्टी यांना आनंददायी ठरला असला तरी हा आनंद फार काळ टिकला नाही.

जुन्या सहकाऱ्यांचे फटकारे

बुधवारी शेट्टी यांच्या विद्यमान आणि पूर्वीच्या अशा दोन्ही सहकाऱ्यांनी विधानपरिषद ओढून घेतल्याबद्दल टीकेची झोड उठवली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, विधानपरिषद मिळण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात शेट्टी यांनी आंदोलन केले नाही.  शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना, आत्महत्या कायम असताना शेट्टी गप्प का राहिले? अशी विचारणाही त्यांनी केली. तसेच शेट्टींची साथ सोडून ‘जय शिवराय किसान संघटना’ स्थापन केलेले शिवाजी माने म्हणाले, “आमदारकीसाठी शेट्टी यांनी स्वाभिमान विकला. ज्या राष्ट्रवादीबरोबर स्वाभिमानीने संघर्ष केला, त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात शेट्टींना जावे लागणे ही कार्यकर्त्यांची शोकांतिका आहे.”

स्वाभिमानीत बंडाचे निशाण?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शिरोळ विधानसभेची निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक आणि राधानगरीमधून निवडणूक लढलेले संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी शेट्टी यांच्या विधानपरिषदेबाबतच्या मुद्द्यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. शेट्टी यांनी विधानसभा, लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी आता विधानपरिषद सदस्यसाठी मादनाईक किंवा पाटील यांच्या नावाला मान्यता द्यावी, अशी मागणी दोघांनी केली होती. मात्र, राज्यपाल कोठ्यातील पात्रतेचे निकष पुढे करून शेट्टी यांनी स्वतःकडे ही जागा घेतली असे म्हणत या दोघांनी नाराजी व्यक्त केली आहे. टाळेबंदीचा कालावधी संपला की याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान करीत त्यांनी संभाव्य बंडाचे निशाण रोवले आहे.