जयसिंगराव पवार, छत्रपती संभाजीराजे यांची पुरावे देण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी शूद्र महिलेशी विवाह केल्याच्या विधानावरून डॉ. रावसाहेब कसबे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी या विधानावर पुरावे देण्याची मागणी केली आहे, तर छत्रपती संभाजीराजे यांनी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांना दूर करण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसरा राज्याभिषेक केल्याची इतिहासात नोंद असल्याचे सारेच मान्य करतात. पण या वेळी त्यांनी एका शूद्र महिलेशी विवाह केल्याचे विधान करून नाहक वाद निर्माण केल्याचे सांगत ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी, कसबे यांनी आता या घटनेचे पुरावे देण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, की महाराजांचा तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक झाल्याचे साऱ्यांनाच मान्य आहे. तांत्रिक राज्याभिषेक करताना शूद्र महिलेशी विवाह करावा असे म्हटले गेलेले आहे. पण याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी अशा पद्धतीने कुणा शूद्र महिलेशी विवाह केला असा होत नाही. एखाद्या म्हणण्याचा असा तर्कदुष्टपणा करून नाहक वाद करण्यात अर्थ नाही. असे खरेच झाले असेल तर तसे म्हणणाऱ्यांनी त्याचे सबळ पुरावे देण्याची जबाबदारी पार पाडावी.

अशा प्रकारचा विचार प्रथम शरद पाटील यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी मांडला होता. त्यामुळे हा मूळचा विचार कसबे यांचा नव्हेच, याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, पाटील यांनी यावर एक पुस्तिका लिहिली होती.  तेव्हा विचारवंत, इतिहास संशोधक यांच्यात चर्चा झडली होती. डॉ. य. दि. फडके यांनी हा दावा अमान्य करत त्या वेळी पुरावे देण्याची मागणी केली होती. परंतु हे पुरावे त्या वेळीही देता आले नाहीत. खरे तर शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना कोणत्या ना कोणत्या संदर्भाचा उल्लेख करून सतत शूद्र ठरवण्याचा यामागे डाव आहे.अशा प्रकारे अर्थाचा अनर्थ करणाऱ्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कसबे हे बेताल बोलत सुटले असल्याचा आरोप केला आहे. लोकशाहीत अधिकार मिळाल्याने ते मूर्खासारखे काहीही बरळत सुटले आहेत. अशा विधानांना त्यांनी पुरावे द्यावेत. समाजात शांतता रहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु असताना अशी बिनबुडाची विधाने करून कसबे यांच्यासारखे लोक समाजात तणाव निर्माण करतात. समाजाने अशा फालतूपणा करणाऱ्यांना जवळ करू नये. तसेच छत्रपती शिवरायांना शूद्र ठरविण्याच्या या वृत्तीपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले.  दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी इतिहासाची चुकीची मांडणी करत राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या कसबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.