अनंत चतुर्दशी दिनी स्वागत कमानी उभारण्यास मनाई केल्याच्या कारणावरून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि इचलकरंजी नगरपालिकेचे  मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यात शुक्रवारी जोरदार शाब्दिक वाद उडाला. स्वागत कमानी लावण्यास मनाई करून  नगरपालिका हिंदूच्या सणावर गंडांतर आणण्याचे काम करत असल्याचा आरोप करीत जाधव यांनी पालिकेने परवानगी न दिल्यास एकही मंडळ श्रींचे विसर्जन करणार नाही असा इशारा दिला.

विसर्जन मिरवणुकी दिवशी ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना स्वागत कमानी लावण्यास नगरपालिकेने मनाई केली आहे. या संदर्भात शुक्रवारी इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादैव गौड, शहरप्रमुख धनाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. स्वागत कमानीचा कोणताही अडथळा अथवा अडचण होत नसताना नगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिवसनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

चच्रेवेळी मुख्याधिकारी रसाळ यांनी, इचलकरंजी हे संवेदनशील शहर असल्यामुळे स्वागत कमानी उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही र्निबध घातले असल्यामुळे नगरपालिका त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर जाधव यांनी,  आजपर्यंत स्वागत कमानींचा कधीच अडथळा झालेला नाही. जिल्ह्य़ात स्वागत कमानी उभारण्यास एकाही नगरपालिकेने मनाई केलेली नाही. तर इचलकरंजी नगरपालिकाच अपवाद का ठरावी असा सवाल केला. यावेळी जाधव आणि रसाळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.