बहुराज्य पाठोपाठ पशुखाद्य दरवाढीने सर्वपक्षीयांकडून कोंडी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या मलईदार कामकाज पद्धतीवरून सर्व विरोधक एकवटताना दिसत आहेत. बहुराज्य दर्जा मिळवू देणार नाही, अशी गर्जना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने संघासमोरील अडचणी वाढल्या असताना आता पशुखाद्य दरवाढीवरून गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह संचालक मंडळाला लक्ष्य केले जात आहे. संचालक मंडळाने पशुखाद्यात मोठी वाढ केल्याने गोकुळ बचाव कृती समिती आणि शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता यामध्ये शिवसेनेने उडी घेतली आहे. यातून गोकुळचे संचालक मंडळ विरुद्ध भाजप, शिवसेना , काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप असे सर्वच राजकीय पक्ष उभे ठाकले असल्याचे चित्र समोर आले आहे.

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ) संघ हा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. गोकुळमधील कोणत्याही निर्णयाचे बरे — वाईट परिणाम होत असतात. गेली काही वर्ष गोकुळच्या मलईदार कारभाराची चर्चा होत आहे. गोकुळ संघातील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे गोकुळ बचाव कृती समितीने चव्हाटय़ावर आणल्याने संघाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

‘बहुराज्य’ योजना बासनात

गोकुळ संघाला बहुराज्य दर्जा मिळवण्याचा प्रयत्न संचालक मंडळ आणि गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांनी चालवला आहे. त्याला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी जोरदारपणे विरोध चालवला आहे. याच मुद्दय़ावरून गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा उधळली गेली होती. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप यांच्याकडून गोकुळच्या बहुराज्य दर्जाला विरोध केला जात असताना लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ संघाला बहुराज्य दर्जा मिळवू देणार नाही’,  अशी घोषणा केल्याने गोकुळचे बहुराज्यचे स्वप्न नसण्याच्या स्थितीत आले आहे. याचवेळी मंत्री पाटील यांनी महाडिक यांना उद्देशून ‘आमची मैत्री पहिली, दुश्मनी पाहू नका’ असा इशारा दिला असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे.

पशुखाद्य दरवाढीने नवे संकट

गोकुळच्या बहुराज्य प्रकरणाने संचालक मंडळाच्या अडचणी वाढल्या असताना संचालक मंडळाने स्वत:हून एका नव्या संकटाला निमंत्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पशुखाद्यमध्ये मोठी दरवाढ केली आहे. गोकुळच्या या निर्णयामुळे संचालक मंडळावर गोकुळ बचाव कृती समिती आणि शेतकऱ्यांनी शनिवारी जोरदार हल्ला चढवला होता. पशुखाद्य दरवाढीच्या मुद्दय़ावर विरोधक पुन्हा एकवटताना दिसत आहेत. आता या आंदोलनात शिवसेना सहभागी होत आहे. पशुखाद्याचे दर कमी करावेत या मागणीसाठी मंगळवारी गाई-म्हशीसह दूध उत्पादक शेतकरी मोर्चा काढणार आहे, असे शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी सांगितले.