07 December 2019

News Flash

पूरग्रस्त कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याची वानवा

पंचगंगा नदीला आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे.

पाण्याची विक्री तिप्पट दराने, माफिया सक्रिय

दयानंद लिपारे, कोल्हापूर

कोल्हापूर शहराला महापुराचा तडाखा बसल्याने निम्म्याहून अधिक शहर पाण्यात बुडाल्याने जलमय बनलेल्या या शहराला आता पिण्याच्या पाण्याची लढाई करावी लागत आहे. आजूबाजूला पाणीच पाणी असताना पिण्याचे पाणी दुर्मीळ झाले असून एकेका बादली-घागरीसाठी टँकरभोवती शेकडो लोकांचा गराडा पडत आहे. सहा लाख लोकसंख्येच्या करवीरनगरीची तहान सध्या अवघे २२ टँकर भागवत आहेत. आपल्याच भागाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर कर्मचाऱ्यांना धमकावले जात असून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविण्यापर्यंत तथाकथित माफियांची मजल गेली. खास टँकरचालक आणि २० लिटर जारमधून पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनी तिप्पट आकाराने पाणी विक्री करून तुंबडय़ा भरण्याचे उद्य्ोग आरंभले आहेत. प्रशासन मात्र जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन गांधारीच्या भूमिकेत वागत आहे. या साऱ्या प्रकारामुळे जलसंकट काळात जलटंचाईने लोकात संतापाची भावना आहे.

पंचगंगा नदीला आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शहरात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. सहा लाख लोकसंखेचे शहर पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाची संततधार होती, पावसाचे पाणी वापरून लोक आला दिवस ढकलत होते. आता पावसाने उघडीप दिली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व कळंबा या दोन्ही पाणीपुरवठा योजना उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी पाण्यात बुडून नादुरुस्त झाल्याने बंद आहेत. परिणामी जनतेला महापालिकेच्या टँकरवर तहान भागवावी लागत आहे.

टँकर माफियांचे राज्य

आपल्या प्रभागात पाण्याचा पुरवठा अधिक व्हावा यासाठी काहींची जीवघेणी धडपड सुरू आहे. त्यातून टँकरची अक्षरशा पळवापळवी सुरू आहे. जो अधिक बाहुबली त्याच्या भागात पाणी आणि दुर्बळ असणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागातील लोकांच्या डोळ्यात पाण्याअभावी पाणी अशी विरुद्ध परिस्थिती आहे. इतकेच काय काही बाहुबली पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी केल्या आहते. पाणीटंचाई संकट कर्मचाऱ्यांच्या अक्षरश: जिवावर उठले आहे.

पाणी विक्रीचा दर वधारला

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे महापालिकेचे नियोजन पाण्यात गेले आहे. पाण्याची आवश्यकता जास्त आणि टँकरची संख्या तोडकी यामुळे शहरात पूर्णपणे पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे दर ग्राहकांचा खिसा कापत आहेत. एरवी ४० रुपये प्रति २० लिटर मिळणारा पाण्याचा जार आता १००, २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खासगी पाणी विक्रेत्यांनी चढय़ा भावाने पाणी विक्री करून खिसे भरण्यास सुरुवात केली असून दीड-दोन हजार रुपये किमतीला विकणारा पाण्याचा टँकर ४-५ हजार रुपये विकून पाण्यावर लोणी काढण्याचा उद्य्ोग आरंभला आहे. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून उद्या १०० टँकरकरवी पाणीपुरवठा करणार असल्याचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

First Published on August 15, 2019 5:20 am

Web Title: shortage of drinking water in flood hit kolhapur zws 70
Just Now!
X