पारंपरिक वाद्यांसह, डॉल्बीचा दणदणाट, डोळे दिपवून टाकणारे लेसर शो अन् बेभान होऊन थिरकणारी तरुणाई अशा उत्साहात विघ्नहर्त्यां गणरायाला निरोप देण्यात आला. पारंपरिक आणि आधुनिकता यांच्या मेळ्यात यंदाची गणेश विसर्जन मिरवणुक तब्बल २६ तास चालली. सोमवारी सकाळी ११ वाजता अखेरच्या श्री मूर्तीचे विसर्जन झाले. महापालिका व सामाजिक संस्थेच्या राबविण्यात आलेल्या मूर्तिदान उपक्रमाला घरगुती गणपतीसोबत सार्वजनिक मंडळांनीही भरघोस प्रतिसाद दिला. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान, इचलकरंजीतही गणेश विसर्जनाची उत्साहात मिरवणूक पार पडली.
खासबाग मदान येथून मानाच्या तुकाराम माळी तरुण मंडळाच्या गणरायाच्या आरतीने मिरवणुकीस प्रारंभ झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर वैशाली डकरे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. ढोल ताशा, बँण्ड पथक, लेझीम व झांज पथक, धनगरी ढोल यासह काही मंडळांनी टाळ मृदंगाच्या निनादात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. यामध्ये महिला व तरुणींचा सहभाग लाक्षणिक होता. अनेक मंडळांनी पर्यावरण व जीव संरक्षण, सामाजिक एकता व शांतता, सोशल मीडियाचा योग्य वापर आदींचे संदेश देणारे देखावे, पोस्टर लावले होते. तर अनेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत समाजप्रबोधन विषयांवर भर दिला होता. मात्र सायंकाळी डॉल्बीच्या ठेक्यासह अनेक मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते.
पंचगंगा घाटावर महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठी क्रेन ठेवली होती. केनच्या साहाय्याने मोठे गणपती पंचगंगा नदी पात्रात विसर्जति करण्यात आले. तर तरटय़ांच्या साहाय्यानेही अनेक गणेशांचे विसर्जन झाले. विसर्जन सोहळा पाहण्यास नागरिकांच्या गर्दीमुळे पंचगंगा घाट फुलला होता. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय पथक तनात केले होते. विसर्जन मिरवणूक मार्गासह शहरातील प्रमुख चौक व उपनगरामध्ये कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. आपल्या तालमीने, मंडळाने आणलेले वेगळेपण तालमीचे अनेक कार्यकत्रे कॅमेऱ्यात टिपून ते मिरवणुकीतूनच सोशल मीडियावर अपलोड करत होते. यासाठी तालमीने एक स्वतंत्र यंत्रणाच उभी केली हाती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्षांना मानाचे श्रीफळ, फेटा, पान-सुपारी देऊन स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने मिरवणूक मार्गावर स्वागत कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
शिवाजी चौक येथील शिवाजी तरुण मंडळाच्या महागणपतीच्या मूर्तीची उंची वाढल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी (सोमवारी) करण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० वाजता मंडपात आरती झाल्यानंतर विसर्जन करण्यात आले. तसेच मिरजकर तिकटी येथे दोन मंडळांच्या वादात पोलिसांनी लेटेस्ट तरुण मंडळास पुढे जाऊ न दिल्याने लेटेस्टच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी न होता सोमवारी मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.