कोल्हापूर शहराच्या उच्चभ्रू व मध्यवर्ती ठिकाणी असलेले तीन तारांकित हॉटेल संशयित करोना बाधित रुग्णांसाठी वापरास देण्याचा निर्णय येथील एका उमद्या युवा उद्योजकांनी घेतला आहे. सिद्धार्थ शिंदे असे या युवकाचे नाव असून त्यांच्या ‘किज सिलेक्ट हॉटेल्स कृष्णा इन’ मध्ये करोनाचे संशयित २५ लोकांना सध्या दाखल केले आहेत. कोल्हापुरातील या प्रयोगाचे स्वागत होत असून जिल्हा प्रशासनालाही त्यामुळे मदत झाली आहे.

सिद्धार्थ शिंदे यांनी सन २०१३ मध्ये कोल्हापूरमध्ये हे हॉटेल सुरू केले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सिद्धार्थ यांनी नोकरी ऐवजी स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्याने त्यांनी शहरातील ताराबाई पार्क या उच्चभ्रू वसाहतीमध्ये हे तीन तारांकित हॉटेल सुरू केले. ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे नातू असलेल्या सिद्धार्थ यांना समाजकार्याची आवड आहे. प्रदूषण, पर्यावरण या विषयावर ते सातत्याने जनजागृती करीत असतात.

सध्या सर्वत्र विषाणूच्या प्रादुर्भावाची चर्चा आहे. कोल्हापुरातही दोन रुग्ण आढळल्याने अनेकांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यापैकी अनेकांना अडचणी आहेत. स्वत:चे घर नसणे, घर लहान असणे किंवा घरात अनेक लोक राहात असणे यामुळे विलगीकरणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन या संशयीतांसाठी जागा शोधत असताना सिद्धार्थ शिंदे यांनी स्वत:हून आपल्या आलिशान हॉटेलमधील २८ खोल्या याकरिता देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यापुढे मांडला. मग प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यावर या तीन तारांकित हॉटेलमध्ये शनिवारी करोनाचे संशयित अशा २५ लोकांना दाखल केले गेले. येथे राहणाऱ्या लोकांसाठी चहा, नाश्ता, भोजन याची सोय देखील शिंदे यांनी केली आहे.

करोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात शासनाला समाजानेही साथ दिली पाहिजे. तरच हे संकट लवकर संपुष्टात येईल या भावनेतूनच आपण या करोना संशयितांसाठी आपले हॉटेल देण्याचा निर्णय घेतल्याचे, सिद्धार्थ यांनी सांगितले.