केंद्र सरकारचे कृषीविषयक तिन्ही नवे कायदे शेतकरीविरोधातील आहेत. हे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेसचा रस्त्यावरील संघर्ष कायम राहील, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी येथे दिला.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ‘ट्रॅक्टर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सांगता दसरा चौकात जाहीर सभेने झाली, या वेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, की करोनाकाळात वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले तरी यातील एक रुपयादेखील शेतकऱ्याला मिळाला नाही. केंद्र शासन पोकळ घोषणा करीत असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पंतप्रधान मोदी यांचा खोटा चेहरा जनतेसमोर उघड  झाला आहे. बिहारच्या निवडणुकीत लोकांनी कांदेफेक करून आक्रोश व्यक्त केला आहे. त्यामुळे आता त्यांनी खोटे बोलणे बंद करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या, ‘नवीन शेतकरी कायदे राज्यांना पाळावेच लागतील’, या विधानाचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला. या कायद्याला पंजाब, राजस्थानप्रमाणेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लागू होऊ देणार नाही. मोदींच्या अहंकारी वृत्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, कांदा निर्यातबंदीवरून केंद्रावर निशाणा साधला. पाकिस्तानातून कांदा आयात केला गेला, मात्र भारतातील शेतकऱ्यांच्या कांद्यावर निर्यातबंदी लादण्याने नुकसान झाल्याची टीका केली. राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार पी. एन. पाटील, शशांक बावचकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सतेज पाटलांचे शक्तिप्रदर्शन

काँग्रेस पक्ष देशभर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करीत असताना ही संधी साधत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आगामी महापालिका व विधान परिषद निवडणुकीचे निमित्त साधून शक्तिप्रदर्शन केले. पदवीधर वा शिक्षकपैकी एक मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, तेथे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, असे ते म्हणाले. सुमारे हजारभर ट्रॅक्टर रॅलीमध्ये आणल्याने एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी ही देशातील सर्वात मोठी रॅली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.