एकरकमी ‘एफआरपी’ देण्याचा कायदा असतानाही तो न पाळणाऱ्या साखर कारखान्यांची साखर जप्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे बुधवारी केली.

‘एफआरपी’च्या मुद्दय़ावरून शेट्टी यांनी गायकवाड यांची आज भेट घेतली. या वेळी शेट्टी म्हणाले, की राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाची ‘एफआरपी’ची रक्कम दिलेली नाही. काही साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची मोडतोड करून शेतक ऱ्यांना रक्कम  दिलेली आहे. दुसरीकडे काही कारखान्यांनी तर गेल्यावर्षीची ‘एफआरपी’ची रक्कमही अद्याप थकवलेली आहे. या सर्व साखर कारखान्यांवर तातडीने साखर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान ‘बी  हेवी मोलॅसिस’पासून इथेनॉल निर्मितीचे अतिरिक्त पैसे ‘एफआरपी’सोबत देण्याचे आदेश कारखान्यांना देण्याची मागणीही शेट्टी यांनी या वेळी केली. हे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांचा साखर उतारा हा एक ते दीड  टक्कय़ांनी कमी होणार आहे. यामुळे पुढील वर्षीच्या ‘एफआरपी’मध्ये घट होत ऊस उत्पादकांचे प्रति टन २८५ ते ४२५  रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या इथेनॉल निर्मितीचे अतिरिक्त पैसे ‘एफआरपी’सोबत देण्याची मागणी शेट्टी यांनी केली.

यावर आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘एफआरपी’च्या ३० टक्के वा अजिबातच रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांबाबतची सुनावणी पूर्ण झालेली असून त्यांच्यावर महसुली कायदा (आरआरसी) अंतर्गत साखर जप्तीची कारवाई सुरू केली जाईल. तर ‘एफआरपी’ची मोडतोड करून शेतकऱ्यांना पैसे देणाऱ्या कारखान्यांची सुनावणी घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. ‘बी हेवी मोलॅसिस’चे उत्पादनाबाबत उत्पादन शुल्क खाते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटकडून माहिती घेत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.