मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानुसार काढला आहे. ठाकरे यांची ही कार्यकुशलता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसत आहे, अशी शेरेबाजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली.

कोकणात निसर्ग चक्रीवादळासाठी १०० कोटी रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. राज्य सरकारची अवस्था धोरण लकव्याची सुद्धा आहे, अशी टीका फडणवीस यांनी आज केलेली आहे. नुकसानीच्या दिवशीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी करून विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तात्काळ मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले होते. तसेच तातडीने पंचनामे करू आणि जेवढे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसान सरकार देण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी जाहीर केले होते. तरीही फडणवीस टीका करीत असून हा हास्यास्पद प्रकार असल्याचे मुश्रीफ यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात करोनाचे हे संकट नियंत्रणात आणले आहे. त्यासह गेल्या सहा महिन्यातील कामाबद्दल ठाकरे हे सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांनी एक ठरले आहेत. हीच गोष्ट विरोधी पक्षनेते फडणवीस यांना खटकली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

माझा सल्ला धुडकावला

पंधरवड्यापूर्वी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’, ‘मौन व्रतामुळे शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून बाहेर येऊन, त्यांचे मन:स्वास्थ्य ठीक राहील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ती पुस्तके वाचलेली दिसत नाहीत. त्यांनी माझा धुडकवला आहे, अशी मिश्किलीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.