मुसळधार पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात रविवारी रात्रीपासून महापुराने हाहाकार उडाला आहे. कृष्णा आणि कोयनेला आलेल्या पुराने सांगली तर पंचगंगेच्या पाण्याने कोल्हापुरातील अनेक भागांत पाणी घुसले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या दोन्ही शहरांतील पूरस्थिती पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

कोल्हापूर शहराला गेल्या दोन दिवसांपासूनच पंचगंगेच्या पाण्याने वेढा घातला आहे. या पाण्यात सोमवारी वाढ झाल्याने शहराच्या अनेक भागांत पाणी घुसले. शाहुपुरी, दसरा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, व्हिनस कॉर्नर आदी मध्यवर्ती भागांत पाणी मोठय़ा प्रमाणात घुसले आहे. ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे पथक रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल झाले. गेल्या दोन दिवसांत पाच हजारहून अधिक पूरबाधित नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यत एकू ण ११७३.३५ व सरासरी ९७.७८ मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणाच्या सर्वच सातही स्वयंचलित दरवाजांतून तेरा हजारहून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दरम्यान, सांगली शहराला या पुराचा मोठा तडाखा बसला आहे. कृष्णा-कोयनेला आलेल्या पुराने सांगलीची कोंडी झाली आहे. पुणे, कोल्हापूर मार्ग बंद झाला असून जिल्ह्य़ातील नदीकाठी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती पथकाला पाचारण करण्यात आले आहे. आयर्वनि पुलाजवळ कृष्णा नदीने सकाळीच धोका रेषा ओलांडली असून, नदीकाठी असलेल्या विविध उपनगरांत पुराचे पाणी शिरले आहे. मारुती रोडवरील व्यापारी वर्गाने मौल्यवान साहित्य हलविण्यास प्रारंभ केला आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पांजरपुथ या ठिकाणी गेल्या २४ तासात विक्रमी म्हणजे ४३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांदोली धरणातून ३४ हजार २०० क्युसेक्सचा विसर्ग वारणा पात्रात होत आहे. तसेच कोयना धरणातूनही विसर्ग मोठय़ा प्रमाणात होत असल्याने वारणा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या १०७ गावांना महापुराचा तडाखा बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. या गावातील पूरग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकडय़ांना पाचारण करण्यात आले आहे. यापकी एक तुकडी सांगलीत आणि एक तुकडी इस्लामपुरात आज सायंकाळी दाखल होत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.