पाऊस सुरू असल्याने स्थिती थोडीशी बिकट असली, तरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्ते दुरुस्तीच्या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला या खात्याचे मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिले. गणेश उत्सवानंतर रस्त्यांच्या अनेक कामांची निविदा उघडण्यात येऊन सर्व रस्त्यांची कामे सुरू होऊन दिवाळीपर्यंत सर्व रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी फार मोठ्या संख्येने गणेशभक्त जात असतात. त्यांचा प्रवास सुखकार व्हावा यासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज कोल्हापूरपासून सुरुवात करून कोल्हापूर, गारगोटी, उत्तूर, आजरा, आंबोली यामाग्रे कोकणातून वैभववाडीपर्यंत पाहणी दौरा करण्यात आला. महाराष्ट्रात गणपती उत्सवापूर्वीच सर्व रस्ते सुस्थितीत व्हावेत, किमान खड्डेमुक्त व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरचा काही भाग आणि कोकणात पाऊस सुरू आहे. यावर मात करून खड्डे भरणे प्राधान्याने सुरू आहे. या कामांची पाहणी आणि आवश्यक सूचना यासाठी सायन-पनवेल, पनवेल-इंदापूर, इंदापूर-खोपोली या रस्त्यांची पाहणी पाटील यांनी केली. मुंबईकर मोठय़ा प्रमाणात गणपती उत्सवाच्या कालावधीसाठी कोकणात जातात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर-गारगोटी, गडिहग्लज-नागनवाडी, चंदगड-भेडशी ते राज्य हद्दीपर्यंत राज्यमार्ग १८९ या रस्त्यावर ६५ कोटी रुपये खर्चून रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येत आहे. तसेच १५ छोटय़ा पुलांचे रुंदीकरण, पाइप मोऱ्यांचे रुंदीकरण, २७ पाइप मोऱ्यांची पुनर्बाधणी आदी कामेही करण्यात येत आहेत. बेलेवाडी घाटाची सुधारणा करण्यात येत आहे. तसेच कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडिहग्लज या मार्गावरही रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येत आहे.