करोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोल्हापुरात दोन्ही टोलनाक्यांवर वाहनांची तोबा गर्दी झाली आहे, तर मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिक्के मारले जात आहेत. मात्र हे शिक्के एकतर सहजपणे पुसले जात आहेत वा ते पुसट होत असल्यामुळे हा उपाय कितपत लाभदायक ठरणार या विषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. या दोन्ही प्रकाराची कोल्हापूर पोलीस यंत्रणेने गंभीर दाखल घेतली असून अकारण प्रवास करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी ‘लोकसत्ता‘ला सांगितले.

देशभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे महानगरातून आपल्या गावाकडे परतणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यतील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही टोलनाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी आहे. विशेषता मुंबई पुण्याहून येणारे प्रवासी हे किणी टोलनाका येथून पुढे जातात. यामुळे किणी टोल नाका येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. अशा प्रवाशांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याकडून पत्र मिळवले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली आहे. येथे सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) सह सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच काही प्रवासी आरोग्य पथक तसेच पोलिसांशी वाद घालत असून प्रशासनासमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

दरम्यान, या प्रकाराची नोंद घेऊन पोलीस यंत्रणेने अधिक कडक भूमिका घेतली आहे. अकारण प्रवास करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. ३ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या २४ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यापुढे अशा चालक, मालकांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुसट शिक्के

राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम कॅरोनटाईनचा शिक्का मारला जात आहे. यातून पळवाट काढण्यासाठी अनेक जण गाडीत बसल्यानंतर पाण्याने शिक्का पुसत आहेत. किंवा पाणी पिण्याच्या बहाण्याने हात धुवून शिक्का घालवत आहेत. या पळवाटेला रोखण्याची मागणी होत आहे. याबाबत अभिनव देशमुख म्हणाले की, निवडणूक विभागाकडे असणारी शाई आरोग्य विभाग वापरत आहे. तो पुसण्याच्या तक्रारी असल्याने आता शिक्का सुकेपर्यंत प्रवाशांना थांबवले जाणार आहे. शिक्का ठळकपणे दिसेल असे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुढील प्रवासाला आवश्यक त्या सूचनांचे पालन करण्याचे बंधन घालून पुढे पाठवले जाणार आहे.’