कोल्हापूर जिल्ह्य़ात येत्या १ जुल रोजी एकाच दिवशी सुमारे ६ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंगोपनाची जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी मंगळवारी येथे बोलताना दिले. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन बंधनकारक असून या मोहिमेंतर्गत लावण्यात येणारी झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
येत्या १ जुल रोजी राज्यात एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बठकीत सनी बोलत होते. या मोहिमेसाठी सर्व विभागांनी आपापल्या विभागाचा समन्वय अधिकारी नियुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमासाठी लावण्यात येणाऱ्या रोपांसाठी ६ लाख खड्डे काढण्यात आले असून यासाठी लागणाऱ्या रोपांची तालुकानिहाय मागणी येत्या १५ तारखेपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाकडे करावी, अशी सूचना करून सनी म्हणाले, वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानुसार सर्व विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रोपांची उपलब्धता सामाजिक वनीकरण, वन विभाग, तसेच खासगी रोपवाटीकामधून केली जाईल, ही रोपे सवलतीच्या दराने देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत ३० जून अखेर निश्चित केलेली रोपे खड्डय़ांपर्यंत पोहोचतील आणि प्रत्यक्षात १ जुल रोजी जिल्ह्यात निश्चित केलेल्या रोपांची प्रत्यक्षपणे लागवड होईल, अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचनाही सनी यांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 million tree planting on july 1 in kolhapur
First published on: 29-06-2016 at 01:03 IST