विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये २२ हजार विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप केले जात आहे. ग्रामीण भागातही हा उपक्रम राबवला जात असून कोल्हापुरात टॅबचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे रविवारी करवीरनगरीत आले होते. जैन बोìडगच्या सभागृहात त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. खासदार विनायक राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह जिल्ह्यातील सहा आमदार उपस्थित होते.
शिवसेनेने विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीत केली होती, असा उल्लेख करुन ठाकरे म्हणाले, केवळ घोषणा न करता त्याची अंमलबजावणी शिवसेनेने केली आहे. मुंबईतील आमदार, नगरसेवक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये २२ हजार टॅबचे वाटप केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवण्याचा शिवसेनेचा मानस आहे. पंतप्रधानांची भेट घेतली तेंव्हाही त्यांना हा उपक्रम मनापासून आवडला. दहावीपर्यंत सर्व अभ्यासक्रम टॅबमध्ये समाविष्ट होणार असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनाही सेनेच्या माध्यमातून टॅब देण्यात येतील.
शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये हद्दवाढ, पाणीपट्टी-घरफाळा वाढ रोखणार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुस्थितीत आणणार, वायफाय सिटी, झोपडपट्टी आवास कार्ड, रंकाळ्यात शिवरायांचे भव्य स्मारक, भ्रष्टाचारमुक्त गतिमान प्रशासन, शाहू स्मारक, अशा वीस कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. हा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, शिवसेना केवळ वचननामा देत नाही तर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात उतरवला आहे. शिवसेनेची ‘करुन दाखवणे’ ही भूमिका कोल्हापूरमध्येही साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरचा टोल बंद करण्यात येईल असा उल्लेख करुन ठाकरे यांनी शिवसेनेचे अधिक नगरसेवक निवडून येतील असे सांगत आकडय़ांना बगल दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2015 रोजी प्रकाशित
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही टॅब वाटप करणार- आदित्य ठाकरे
कोल्हापुरात टॅबचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली.
Written by दया ठोंबरे

First published on: 26-10-2015 at 02:05 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray campaign tour