कृषी मंत्रालयाच्या पाहणीत वापर वाढल्याचे निदर्शनास
शेतीतून प्रमाणापेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासातून बेसुमार कीडनाशकाचा वापर केल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे केंद्र शासनाच्या कृषी विभागाने राज्यात केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. विहित प्रमाणकापेक्षा अधिक कीडनाशकाचे उर्वरित अंश पिकामध्ये आढळून येणे, हे कृषी, आरोग्य क्षेत्रात अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जाते. मानवी जिवाशी खेळणाऱ्या या धोक्याची जाणीव झाल्याने राज्य शासनाच्या कृषी विभागाचे डोळे उघडले असून या प्रकाराला वेसण घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम हाती घेणे भाग पडले आहे.
शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी शेतकरी करीत असलेल्या प्रयत्नांना कृषी विभागासह अभ्यासकही योग्य मार्गदर्शन करत असतात. एका फवारणी नंतर दुसरी फवारणी करण्यासाठी काही कालावधी निश्चित केलेला असतो. त्यास कृषी शास्त्राच्या भाषेत कीडनाशकांच्या उर्वरित अंशाचे नियंत्रण असे म्हटले जाते. पण शिवारातील पीक जोमाने यावे यासाठी काही शेतकरी कीडनाशकाचा बेसुमार वापर करतात. पीक नक्की तरारून येईल, याविषयी साशंकता असल्याने असे शेतकरी उर्वरित अंशाचे नियंत्रण कालावधीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून भाजीपाल्यावर मनमानी कीडनाशकांचा वापर करतात. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा ज्यादा येऊन बक्कळ कमाई होते खरी , पण त्याचे अगणित सामाजिक तोटे होतात, याकडे दुर्लक्ष होते.
ही बाब केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. या पथकाने चिखली , जिल्हा बुलढाणा येथून संकलित केलेल्या कोबी व हिरवी मिरची या भाजीपाल्याच्या नमुन्यात केंद्रीय अन्न सुरक्षा व गुण नियंत्रण विभागाने ठरवून दिलेल्या प्रमाणकापेक्षा अधिक कीडनाशकांचे उर्वरित अंश आढळून आले आहेत . हे एक उदाहरण असले तरी अनेक शेतकरी कोबी , मिरची , वांगी , टोमॅटो अश्या प्रकारे पीक घेत असल्याचे शासकीय कृषी अधिकारी सांगतात . मानवी आरोग्यासाठी हा धोक्याचा इशारा असून अशा प्रकारचा भाजीपाला सेवन केल्याने कर्करोग , अर्धागवायू , ब्रेन हॅमरेज आदी गंभीर रोगाची शिकार व्हावे लागते . पशाच्या मोहाने शेतकरी अशी पिके घेत असला तरी त्याची जिवापाड किंमत ग्राहकांना मोजावी लागते .
या प्रकारची गंभीर दखल राज्याच्या कृषी विभागाने घेतली आहे . कृषी आयुक्तालयाने एका परिपत्रकाद्वारे सर्व जिल्ह्यातील कृषी विभागास याची डोळसपणे नोंद घेण्यास सांगितले असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची जागृती निर्माण करण्याची मोहीम राबवण्यास सांगितले आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन व प्रमाणित कीडनाशकांचा वापर करण्यासाठी त्यांना उद्बोधित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती येथील कृषी उप अधीक्षक सुरेश मगदूम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.