सभासदांचा विश्वास गमावल्याचा अध्यक्षांवर आरोप

कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम नेटकेपणाने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. अध्यक्ष अशोक चराटी यांनी आर्थिक तरतूद करण्यास नसल्याने साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या ३० हजार सभासदांचा विश्वास चराटी यांनी धुळीस मिळवला आहे, असा आरोप कारखान्याच्या विरोधी गटाच्या संचालकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. यामुळे पुन्हा एकदा आजरा साखर कारखान्यातील यादवीला सुरुवात झाली असून कारखान्याच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.

नुकताच संपलेला गळीत हंगाम संचालक मंडळाऐवजी कामगारांनी चालवून दाखवला. सध्या आजरा साखर कारखान्याची परिस्थिती हातबाहेर गेली आहे. १ मे रोजी कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी सर्व संचालक यांना विशेष नोटीस देऊ न अनौपचरिक बैठक बोलावली होती. या वेळी झालेली चर्चेच्या अनुषंगाने विरोधी संचालकांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

विष्णुपंत केसरकर म्हणाले, आगामी गळीत हंगामाच्या पूर्वतयारीबाबत अध्यक्ष चराटी काही भूमिका मांडतील असे वाटले होते, पण त्यांनी घोर निराशा केली. आगामी गळीत हंगामाकरिता आर्थिक तरतूद करण्यास असमर्थ असल्याचे सांगून त्यांनी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत विषय बैठकीत मांडला. ज्या विश्वासाने ३० हजार सभासदांनी कारखाना चराटी व सर्व सत्ताधारी संचालक यांनी कारखाना चालवण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला होता, तो त्यांनी धुळीस मिळवला आहे. कारखान्याच्या या अपयशाला अध्यक्ष चराटी  व त्यांच्या चुकीच्या धोरणांना साथ देणारे संचालक जबाबदार असल्याचा आरोप विरोधी गटाचे  संचालक केसरकर यांनी केला.

तर संचालक सुधीर देसाई म्हणाले, की गेल्या काही वर्षांमध्ये आजरा कारखाना स्वबळावर चालवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. कारखान्याला ‘उत्कृष्ट पुनरुज्जीवन’ असा पुरस्कार देखील प्राप्त झाला. २००९-१० साली सुमारे ४१ कोटींवर असलेला संचित तोटा २०१२-१३ पर्यंतच्या तीन वर्षांत सुमारे १८ कोटींवर आणला. २०१३ -१४ च्या आर्थिक वर्षांत चराटी यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे संचित तोटा २३ कोटींवरून ३० कोटींवर गेला. २०१६ साली झालेल्या कारखाना निवडणुकीत पुन्हा चराटी यांच्याकडे सत्ता राहिली. चालू वर्ष अखेर संचित तोटा जवळपास ८८ कोटींपर्यंत पोहोचला आहे. याला सत्ताधारी संचालक मंडळाचा व्यवहारशून्य कारभार जबाबदार आहे.

या वेळी संचालक अंजना रेडेकर, सुनील शिंत्रे, लक्ष्मण गुडुळकर, मुकुंद देसाई, एम. के. देसाई, वसंत धुरे या विरोधी संचालकांनी आपले मत मांडले.