१८८५ पासून अनेक भूकंपाचे धक्के सहन करीत कणखरपणे उभी असून यात अ‍ॅनी बेझंट यांच्या पुढे जाऊन सोनिया गांधी गेली १८ वष्रे काँग्रेसची धुरा समर्थपणे वाहत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोनियांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला.
सोलापुरात दिवंगत स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृ. भी अंत्रोळीकर स्मृती न्यासाच्यावतीने ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर व ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना अनुक्रमे कर्मयोगीकार रामभाऊ राजवाडे आणि हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बानहुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार होते. शेतकरी संघटनेचे स्थानिक ज्येष्ठ नेते वसंत आपटे यांना आदर्श समाजसेवेचा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु शेतकरी संघटनेचे झुंजार नेते शरद जोशी यांच्या निधनामुळे आपटे हे पुरस्कार वितरण सोहळ्यास येऊ शकले नाहीत. डॉ. अंत्रोळीकर स्मृती न्यासाच्या सुजाता अंत्रोळीकर यांनी स्वागत केले. तर न्यासाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक भाषणात डॉ. अंत्रोळीकर यांच्यासह कर्मयोगीकार रामभाऊ राजवाडे व हुतात्मा कुर्बानहुसेन यांच्या स्वातंत्र्य लढय़ातील उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला.
आयुष्यभर नतिकता आणि मूल्ये घेऊन पुढे गेलो तर माणसाचे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरते, असे नमूद करीत सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात काँग्रेसमध्ये दर दोन-तीन वर्षांत अध्यक्ष बदलला जायचा. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांनी आपल्या पतीने देशासाठी बलिदान दिले असताना काँग्रेसची धुरा मोठय़ा समर्थपणे सांभाळली. अ‍ॅनी बेझंट यांच्यापेक्षा पुढे जाऊन सोनिया गांधींनी पक्ष संघटनेचे कार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सोलापूरचा १९३० सालचा मार्शल लॉ लढा संपूर्ण हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य लढय़ात एकमेव असून तो तेवढाच जाज्ज्वल्य आहे. परंतु देशाच्या इतिहासात सोलापूरच्या या कामगिरीची दखल म्हणावी तशी घेतली नाही. त्यावर आणखी संशोधन होऊन ते देशात नेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी कुलगुरू डॉ. मालदार यांनी दोन्ही पुरस्कार मानकऱ्यांचा गौरव करून सोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. पुरस्काराचे मानकरी राजा माने व एजाजहुसेन मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. रत्ना शहा-अंत्रोळीकर यांनी सूत्रसंलाचन केले. तर डॉ. श्रीकांत कामतकर यांनी आभार मानले. या समारंभास डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, डॉ. व्ही. एन. धडके, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, शंकर पाटील, डॉ. नभा काकडे, प्राचार्य के. एम. जमादार तसेच अंत्रोळीकर कुटुंबीय उपस्थित होते.