कोल्हापूर : अलमट्टीतून ३ लाख क्युसेक पाणी सायंकाळपासून सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीवेळी सांगितले. जिल्ह्यात अजून दीड महिना पावसाळा असतो हा विचार करुन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाईन स्वरुपात पुरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणीपातळी, धरणसाठा, स्थलांतरीत संख्या तसेच राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. हेही वाचा : कोल्हापुरातील शाळांना शुक्रवारी, शनिवारी सुट्टी जाहीर; गुरुजी मात्र शाळेतच पुरस्थितीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातून २ लाख क्युसेक विसर्ग होतो. तसेच यात कृष्णा नदीचाही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून ३ लक्ष क्यूसेक पाणी विसर्ग सुरू होणार आहे,असे सांगितले. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्ग अलमट्टीतून व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हयात ज्या ठिकाणी ६५मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तातडीने पंचनामे करा. सर्व तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. घरांची पडझड, इतर नुकसान तसेच शेतीचे नुकसान याबाबत पंचनामे त्या त्या वेळी करणे सुरु असून एका महिन्यात भरपाई देण्याचे नियोजनही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले. सध्या पंचगंगा व इतर नद्याही धोका पातळीवर वाहत आहेत. दिवसापेक्षा रात्रीचा पाऊस धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामूळे नदीकाठची गावे आणि विशेषत: कोल्हापूर महानगरपालिकेने जास्त सतर्कता बाळगावी, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हयातील खासदार व आमदार यांनी आपापल्या भागातील गावांमधे पुरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती व येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सांगितल्या. हेही वाचा : Kolhapur Rain Alert: कोल्हापुरात पंचगंगेने धोका पातळी ओलांडली; महापूराची चिन्हे पालकमंत्री यांनी जिल्हयातील पावसाळा हा ऑगस्टच्या शेवटपर्यंत राहत असल्याने किमान पुढील दीड महिना पुरस्थितीच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे आदेश दिले. मागील पुरस्थितीचा अनुभव लक्षात घेवून शहरी तसेच ग्रामीण प्रशासनाने नियोजन करावे. नागरिकांचे स्थलांतर, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, जनावरे व त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था तसेच आवश्यक आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यांवरील धोकादायक खड्डे तसेच साठलेले पाणी याबाबत दुरूस्त्या कराव्यात. पडणारी झाडे वेळेत काढावीत व वाहतूक सुरु करावी याबाबतही सूचना त्यांनी दिल्या.जिल्ह्यात सायंकाळी जास्त पाऊस पडत असल्याने नदी पात्रातील पाणीपातळी रात्री झपाट्याने वाढत आहे. त्यामूळे कोल्हापूर महानगरपालिकेने पाणीपातळीतील वाढ पाहून नागरिकांचे वेळीच स्थलांतर करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.