कोल्हापूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय समाज माध्यमाद्वारे जाहीर करण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा आजच शासन निर्णय जाहीर करावा. उद्याचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा रद्द करून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे अभिनंदन करू, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आज खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवेदनाच्या आधारे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देण्यात येईल. याबाबत लवकरच शासन आदेश काढावेत, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. हा संदर्भ घेऊन शेट्टी यांच्या उद्याच्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाला शह दिल्याचे म्हटले जात आहे.

..तर मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी आपली भूमिका समाज माध्यमाद्वारे जाहीर केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की महाविकास आघाडी सरकारने २८ जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.