पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा प्रस्ताव
श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी परिसर विकास आराखडय़ांतर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या तर माणगाव परिसर विकास आराखडय़ांपकी पहिल्या टप्प्यातील ५ कोटींच्या आराखडय़ास जिल्हा पर्यटन समितीने मान्यता दिली. तर श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडय़ाबाबत लवकरच बठक घेऊन लोकप्रतिनिधी, जनतेच्या सूचना विचारात घेऊन आराखडा तयार केला जाणार आहे.
जिल्हा पर्यटन समितीची बठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बठकीस खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी होते.
श्री क्षेत्र जोतिबा मंदिर, वाडी रत्नागिरी परिसर विकासाचा १५५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, यापकी पहिल्या टप्प्यातील २५ कोटींच्या आराखडय़ास बठकीत मान्यता देण्यात आली असून, यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, पाìकग, टॉयलेट कॉम्प्लेक्स, सांडपाणी आदी कामांचा समावेश आहे. तर माणगाव परिसर विकास आराखडा सुमारे १०० कोटींचा असून, यापकी ५ कोटींच्या आराखडय़ास मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रवेशद्वारे, स्मारक, तलाव विकास, शाळा इमारत विकास, मदान विकास आदी कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील निधी शासनाकडून प्राधान्याने उपलब्ध होणार असून, ही कामे तत्काळ सुरू करण्याची सूचना पाटील यांनी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर परिसर विकासाचा ७२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, हा आराखडा निश्चित करताना मंदिर आणि भाविक यांना केंद्रिबदू मानून हा आराखडा निश्चित करण्याची सूचना पाटील यांनी केली.