कोल्हापुरातील दर्शन शहा या मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणी मंगळवारी न्यायालयाने आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला १ लाख ५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी हा निकालाची सुनावणी केली. आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा दर्शन शहा याची आजी आणि आईने व्यक्त केली होती.
दर्शन शहा याचे २५ डिसेंबर २०१२ मध्ये तो रहात असलेल्या परिसरातून योगेश उर्फ चारू चांदणे याने अपहरण केले होते. दुसऱ्या दिवशी देवकर पाणंद परिसरातील विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला होता, त्याचबरोबर दर्शनच्या घरासमोर मुलाच्या सुटकेच्या मोबदल्यात २५ तोळे सोने द्यावे, अशी चिठ्ठीही मिळाली होती. पोलिसांनी घटनेचा तपास करून चारू चांदणे या आरोपीला ताब्यात घेतले होते. मार्च २०१३ मध्ये चांदणे याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जानेवारी २०१६ पासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली. मात्र, चारू चांदणे याने आरोप फेटाळून नार्को आणि ब्रेन मॅपिंगची मागणी केली होती. २ ऑगस्टपासून खटल्याची नियमित सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयात ३० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २२ पुराव्यांची साखळी मांडली. याशिवाय परस्थितीजन्य पुरावेही मांडले. आरोपीला त्याचे मत मांडण्याची संधी दिली होती, यावर न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचे मत जाणून घेतले.