कोल्हापूर : फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कोल्हापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश सिद्धाराम मात्रे (वय ३८) व पोलीस हवालदार रुपेश तुकाराम कुंभार (व ४१) यांना पहाटे अडीच वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले.
प्रकरणातील तक्रारदार यांच्या आत्याच्या मुलाविरुद्ध कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये आत्याच्या मुलास अटक करू नये यासाठी तक्रारदाराचे प्रयत्न सुरू होते. या कारवाईमध्ये अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मात्रे व पोलीस हवालदार रुपेश कुंभार यांनी आठ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. ती रक्कम देण्याचे ठरले. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम नागेश म्हात्रे व रुपेश कुंभार हे एनसीसी भवनजवळ स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – कोल्हापूर: अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाचे धागे जुळले; ७०८ कोटीची भरघोस तरतूद
हेही वाचा – Video: मोठी बातमी! हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा; दीड महिन्यातील दुसरी कारवाई
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांच्यासह पथकाने केली. इतक्या मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम स्वीकारत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी जाळ्यात सापडल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.