दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीच्या उलथापालथींमध्ये कोणाचे भाग्य उजळते तर कोणाला जनप्रतिसादाअभावी हिरमुसून बसावे लागते. कोल्हापूर जिल्ह्य़ात बडय़ा राजकीय घराण्यातील अशा अनेक नामांकितांचे लोकप्रतिनिधित्व निघून गेले होते. पण, २४ तारखेला त्यांचा राजकीय भाग्योदय झाला आणि अर्धा डझन नेत्यांच्या अंगावर पुन्हा एकदा ‘आमदारकी’चे प्रतिष्ठेचे वस्त्र चढले आहे. विनय कोरे, प्रकाश आवाडे हे माजी मंत्री पुन्हा, राजेश पाटील, राजू जयवंतराव आवळे यांच्या घराण्यात पुनश्च आणि जंगजंग पछाडल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घराण्यात प्रथमच आमदारकी आली. राजकीय अपयशाच्या गर्तेत गेलेल्या या बडय़ा घराण्यात विधानसभेच्या यशाने राजकीय भवितव्यही दिवाळी सणात उजळून निघाले आहे.

राजकारणातही यशापयशाच्या समीकरणाचे हिंदोळे सतत झुलत असतात. निवडणुकीच्या आखाडय़ात सतत अपयश येत गेले तरी यशाचा दिवस कधीतरी उजाडतोच. यावेळच्या विधानसभा निवडणूक निकालाने याची प्रचिती घडवली आहे. कोल्हापूर सारख्या भागात राजकारण आणि सहकार याची वाटचाल एकाच मार्गाने पुढे सरकत असते.

सहकार क्षेत्रात केलेल्या कामाच्या आधारे राजकीय पैस रुंदावत जातो. अशा अनेक राजकीय घराण्यांनी राजकारण आणि सहकार या दोहोत यशाची कमान उंचावल्याचे दिसते. मात्र त्यातील काही बडय़ा राजकीय नेत्यांना, घराण्यांना सार्वत्रिक निवडणुकीच्या अपयशाने झाकोळून टाकले होते. यंदाच्या निवडणूक निकालाने त्यांची अपयशाची काजळी बाजूला सारली जाऊ न यशाचा प्रकाशझोत पुन्हा लाभला आहे.

वारणा सहकार समूह आणि तात्यासाहेब कोरे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित. त्यांचे नातू विनय कोरे यांनी राजकारणात प्रवेश करून अल्पावधीत मोठे नाव कमावले. आमदार, मंत्री, स्वत:चा जनसुराज्यशक्ती पक्ष अशी त्यांची नेत्रदीपक वाटचाल. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्याभोवतीचे वलय कमी होत गेले.

या निवडणुकीत कोरे यांनी धमाकेबाज पुनरागमन करून आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे. वस्त्रनगरी इचलकरंजी परिसरात आवाडे हे बडे प्रस्थ. कल्लाप्पाण्णा आवाडे हे आमदार, मंत्री, खासदार अशा यशाच्या राजकीय शिडय़ा चढत गेले. याच मार्गाने जात त्यांचे पुत्र प्रकाश आवाडे यांनी चार वेळा आमदार, दोनदा मंत्रिपद मिळवले. पण पुढे या घराण्याला अपयशाने ग्रासले. नगरपालिका, विधानसभा, लोकसभा असा सतत पराभवाचा सामना करावा लागला. या अपयशावर मात करीत प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्य़ात सर्वाधिक मतांनी विजय मिळवत आवाडे घराण्याचे नाव पुन्हा प्रकाशात आणले आहे. पाच वेळा आमदार, मंत्री आणि लातूरचे खासदार असा चढत्या भाजणीचा राजकीय प्रवास करणारे जयवंतराव आवळे यांना आणि त्यांचे वारसदार राजू आवळे या पितापुत्रांना सलग दोनदा विधानसभेच्या आखाडय़ात पराभूत व्हावे लागल्याने आवळे घराण्याची जादू संपली अशी चर्चा होऊ लागली. पण यंदा भाजपाने केलेल्या बंडखोरीमुळे मतविभागणी होत राजू आवळे यांना निसटता विजय मिळाला. जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात नरसिंग गुरुनाथ पाटील हे बडे नाव. त्यांनी तीनदा विधानसभा निवडणूक जिंकली तीही तीन वेगवेगळ्या पक्षाकडून. पण दोन वेळा पराभवाने पाठ धरल्याने पाटील यांचे राजकीय वजन घसरले. अपयशाचा हा शिक्का या वेळी त्यांचे सुपुत्र राजेश पाटील यांनी पुसून काढून पाटीलकीची ताकद दाखवून दिली आहे.

यड्रावकर घराण्याला यश

राजकारणात अपयश असते हे मान्य. मात्र, ते कितीवेळा असावे ? शिरोळच्या पाटील घराण्यातील दोन पिढय़ांना मिळून सलग चार वेळा अपयशालाच तोंड द्यावे लागले. श्यामराव पाटील यड्रावकर यांनी हयातीत दोनदा निवडणूक लढवली पण यशाचा गुलाल काही लागला नाही. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राजेंद्र पाटील यांनाही दोनदा पराभूत व्हावे लागल्याने पाटील घराण्याला विधानसभेचे यश धार्जिणे नाही अशी खिल्ली उडवली जात होती. ही सारी कसर भरून काढीत राजेंद्र पाटील यांनी अखेर यड्रावकर घराण्यात आमदारकी खेचून आणत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big political leaders in kolhapur get political power in assembly elections abn
First published on: 09-11-2019 at 01:15 IST